“हा विजय म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…”; फडणवीसांनी मानले बिहारमधील मतदारांचे आभार

भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला अर्थात एनडीएला बिहारमध्ये स्पष्ट बहुमत

संग्रहित (सौजन्य – फेसबुक)

बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीची दिवाळी गोड झाली आहे. भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने अर्थात एनडीएने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता कायम राखली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पहाटेपर्यंत सुरु होती. सर्व २४३ जागांचे निकाल हाती असून एनडीएने १२५ जागा मिळवल्या आहेत. या १२५ जागांपैकी ७४ जागांवर विजय मिळवत भाजपा दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. नितीश कुमार यांच्या जदयूने ४३ जागांवर तर मित्र पक्षांनी ८ जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे आता नितीशकुमारच बिहारच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील हे स्पष्ट झालं आहे. या निवडणुकीसाठी भाजपाकडून प्रभारी म्हणून काम पाहणारे देवेंद्र फडणवीस यांनी या विजयानंतर बिहारच्या जनतेचे आभार मानले आहेत. हा विजय म्हणजे मोदींवरील विश्वास कायम असल्याचे संकेत आहेत असं महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

फडणवीस यांनी फेसबुकवरुन यासंदर्भातील पोस्ट शेअर केली आहे. “बिहारच्या जनतेने त्यांना विकास हवा असून जंगलराज नकोय हे दाखवून दिलं आहे. आमचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झालं आहे. नितीश कुमार यांच्यावर बिहारच्या जनतेने पूर्ण विश्वास टाकला आहे. मी बिहारच्या जनतेचे आभार मानतो. बिहारमध्ये भाजपाने ११० जागांवर निवडणूक लढवली आणि त्यामध्ये विजयाची टक्केवारी ६७ टक्के इतकी असून २०१५ मध्ये हीच टक्केवारी ३४ इतकी होती. याचे संपूर्ण श्रेय पंतप्रदान नरेंद्र मोदी यांच्या गरीब कल्याण योजना आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांना जातं. मी बिहारमधील भाजपाच्या टीमला खूप साऱ्या शुभेच्छा देतो.संपूर्ण बिहारने करोना कालावधीमध्येही उत्साहाने निवडणुकीमध्ये सहभाग नोंदवला आणि संपूर्ण जगाला एक आदर्श घालून दिला. या यशस्वी निवडणुकीसाठी मी निवडणूक आयोगाचेही आभार मानतो,” असं फडणवीस म्हणाले आहेत.

आणखी वाचा- Bihar Election Result : जनतेनं पोकळ आश्वासनं, जातीयवादाच्या राजकारणाला नाकारलं – अमित शाह

देशातील पोटनिवडणुकींबद्दलही फडणवीस यांनी सर्वांचे कौतुक केलं आहे. “देशातील ११ राज्यांमधील पोटनिवडणुकींमध्येही भाजपाने मोठे यश मिळवले आहे. बिहारबरोबरच या राज्यांमध्ये जनतेने भाजपाला मिळालेला कौल हा मोदींवरील विश्वासाचे प्रतिक आहे. गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, तेलंगणाबरोबरच अन्य राज्यातील आमच्या भाजपा कार्यकर्त्यांचेही मी अभिनंदन करतो. या सर्व निवडणुकींमधील विजयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांनी जे मार्गदर्शन केलं, जे कष्ट घेतले त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो,” असं फडणवीस म्हणाले आहेत.

आणखी वाचा- Bihar Election: “संजय राऊतांमुळे शिवसेनेची महाराष्ट्रातही अशीच अवस्था होईल”

विरोधकांची स्थिती काय?

महाआघाडीने ११० जागा मिळवल्या आहेत. यामध्ये राजदने सर्वात चांगली कामगिरी केली आहे. तेजस्वी यादव यांचा राजद हा ७५ जागा मिळवत बिहारमधला सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. महाआघाडीतल्या काँग्रेसला १९ जागांवर तर डाव्यांना १६ जागांवर विजय मिळाला आहे. एमआयएमला पाच जागा तर बसपा, लोजपा आणि अपक्ष यांना प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bihar election results devendra fadnavis thank people of bihar scsg