Bihar Govt Formation Formula: बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून एनडीएनं घवघवीत यश मिळवल्याचं समोर आलं आहे. विरोधकांचा मोठा पराभव या निवडणुकांमध्ये झाला आहे. या पार्श्वभूमीवर एकीकडे विरोधी गोटात नेमकं कुठे चुकलं याबाबत चर्चा, आरोप होऊ लागले असताना दुसरीकडे सत्ताधारी गोटात पुढील सरकार कसं स्थापन करावं? कुणाला काय आणि किती मिळावं? याविषयी खल होऊ लागले आहेत. सत्तेतील वाट्याबाबतची जोरदार चर्चा होत असताना भारतीय जनता पक्षातून समसमान वाटपाचा प्रस्ताव समोर आला असून त्यावरच शिक्कामोर्तब होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

बिहार निवडणूक निकाल काय लागले?

नुकत्याच लागलेल्या बिहार विधानसभा निवडणूक निकालांमध्ये भारतीय जनता पक्ष ८९ जागांनिशी राज्यातला सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यापाठोपाठ नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाने ८५ जागांसह दुसरं स्थान मिळवलं आहे. एनडीएतील इतर घटक पक्ष लोकजनशक्ती पार्टी (रामविलास) ला १९, हिंदुस्तानी आवाम मोर्चाला ५ तर राष्ट्रीय लोक मोर्चाला ४ जागांवर विजय मिळाला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला ७४ तर जदयूला ४३ जागा जिंकता आल्या होत्या. या निकालानंतर गेल्या वेळी स्थापन झालेल्या सरकारमध्ये भाजपाला २२ तर नितीश कुमार यांच्या जदयूला फक्त १२ मंत्रीपदं मिळाली होती. त्यामुळे आता जदयूनं ८५ जागा जिंकल्यानंतर मंत्रीपदांचं वाटप कसं होणार? याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

काय आहे बिहारमध्ये सत्तावाटपाचा फॉर्म्युला?

इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय जनता पक्षामध्ये बिहारमधील सत्तावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. जनता दल युनायटेडकडे सत्तास्थापनेसाठी हाच फॉर्म्युला प्रस्तावित केला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. सोमवारी जदयूची तर मंगळवारी भाजपाची पक्षीय बैठक होणार असून त्यात यासंदर्भात शिक्कामोर्तब केलं जाणार असल्याची चर्चा आहे. येत्या २२ नोव्हेंबर रोजी बिहारच्या विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ संपुष्टात येत असून त्याआधी म्हणजेच २१ तारखेपर्यंत शपथविधी होण्याची शक्यता आहे.

भाजपाच्या अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारच्या मंत्रीमंडळात भाजपा व जदयू यांना समसमान मंत्रीपदं, चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टी (रामविलास)ला दोन मंत्रीपदं तर उपेंद्र कुशवाह यांच्या राष्ट्रीय लोक मोर्चा व जितन राम मांझी यांच्या हिंदुस्तानी आवाम मोर्चाला प्रत्येकी एक मंत्रीपद असा फॉर्म्युला बिहारमध्ये अस्तित्वात येण्याची शक्यता आहे.

नितीश कुमार यांच्या नावावर भाजपात एकमत

दरम्यान, नितीश कुमार यांना मुख्यमंत्री करण्यावर भारतीय जनता पक्षामध्ये एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, एकीकडे मुख्यमंत्रीपदाचं ठरलं असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्रीपदाबाबत मात्र भाजपात अद्याप नेमकी नावं निश्चित झालेली नाहीत. विद्यमान उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्यावर प्रशांत किशोर आणि माजी केंद्रीय मंत्री आर. के. सिंह यांनी भ्रष्टाचार व निवडणूक प्रतिज्ञापत्रात गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा उपमुख्यमंत्रीपद मिळणार की नाही? यावर चर्चा सुरू झाली आहे. पण बिहार निकालांनंतर केलेल्या भाषणात खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सम्राट चौधरी व विजय कुमार सिन्हा यांची नावं घेऊन कौतुक केलं. त्यामुळे पक्षातील उच्चपदस्थ त्यांच्या बाजूने असल्याचं बोललं जात आहे.