Bihar poll results RJD alleges Truck loaded with EVMs snuck into counting center gets election officer response : राष्ट्रीय जनता दल पक्षाने बुधवारी रात्री मत चोरीचे नवीन आरोप केले होते, त्यांनी असा दावा केला की, ‘ईव्हीएमने भरलेला ट्रक’ मतमोजणी केंद्रात घुसण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा त्यांनी दावा केला होता. या घटनेचा निषेध करण्यासाठी तसेच भारतीय निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण घेण्यासाठी पक्षाचे कार्यकर्तेही या परिसरात जमले होते.
शुक्रवारी बिहार निवडणुकीच्या मतमोजणी होणार असून यापूर्वी काँग्रेस आणि आम आदमी पक्ष आ सह इतर विरोधी पक्षांनी देखील असेच अरोप केले होते.
यादरम्यान बिहारच्या रोहतासचे जिल्हा दंडाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी उदिता सिंह यांनी याबद्दल स्पष्टीकरण दिले असून त्या वाहनातील कंटेनर रिकामे होते असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
“कथितरित्या ईव्हीएमने भरलेला ट्रक सासाराम (रोहतास जिल्हा) येथील मतमोजणी केंद्रात जिल्हा प्रशासनाकडून कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय आणि पारदर्शकतेशिवाय का घुसवण्यात आला? ट्रकचालकांना समोर न आणता त्यांना का पळवून लावले? दुपारी २ वाजल्यापासून येथील सीसीटीव्ही कॅमेरा फीड का बंद ठेवण्यात आले? संपूर्ण फुटेज जारी केले जावे! ट्रकमध्ये काय आहे, हे प्रशासनाने सांगावे!” अशी पोस्ट आरजेडीच्या एक्स खात्यावरून करण्यात आली आहे.
“या घटनेबद्दल माहिती मिळाल्यानंतर ट्रकची सासाराम येथील तकिया बाजार समिती जवळच्या मतमोजणी सेंटरच्या प्रवेशद्वाराजवळ तपासणी केली गेली. ही तपासणी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांच्या समोर करण्यात आली. या संपूर्ण तपासणीचा व्हिडीओ देखील काढण्यात आला. यामध्ये स्टीलचे कंटेनर पूर्णपणे रिकामे आढळून आले आणि त्यामध्ये कोणतेही ईव्हीएम आढळून आले नाही. त्यामुळे ट्रक भरून ईव्हीएम असल्याचा दावा खोटा आहे,” असे निवेदन रोहतासच्या डीएमी दिले आहे.
‘आप’चा बिहारमध्ये ८० लाख मते चोरल्याचा दावा
आम आदमी पक्षाचे वरिष्ठ नेते संजय सिंह यांनी गुरुवारी बिहार विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचा आरोप केला आहे. त्यांनी बिहारमध्ये जवळपास ८० लाख मतांची चोरी झाल्याचा दावा केला असून हे भाजपाने घडवून आणल्याचा आरोप केला आहे. मतांच्या कथित फेरफारामुळे निवडणुकीच्या निकालावर मोठा परिणाम होईल, असे सिंह यांनी सांगितले.
“आम्हाला १४ नोव्हेंबर रोजीच्या निकालाची वाट पाहावी लागेल. मी एक गोष्ट स्पष्टपणे सांगत आलो आहे की, मत चोरीचा या निवडणुकीवर मोठा परिणाम होईल. हे नाकारलेच जाऊ शकत नाही की बिहारमध्ये ८० लाख मतांची चोरी झाली आहे. ८० लाख मतदारांना त्यांच्या मतदान करण्याच्या हक्कापासून दूर ठेवण्यात आले आहे,” असे सिंह म्हणाले.
त्यांनी पुढे असाही आरोप केला की मृत नागरिकांच्या नावे बनावट फॉर्म दाखल करण्यात आले आहेत. तसेच त्यांनी हा गैरप्रकार निवडणूक आयोग आणि भाजपा नेत्यांचा सहभाग असलेला एक घोटाळा असल्याचे म्हटले आहे.
“निवडणुकीच्या आधी कशा प्रकारे मृत व्यक्तींच्या सह्या असलेले अर्ज सादर केले जात होते, हे आम्ही पाहिले आहे. जे लोक कधीच हजरही राहिले नाहीत, त्यांच्या सह्या असलेले फॉर्म सादर केले जात होते. अशा प्रकारे हा घोटाळा उघडकीस आला आहे, आणि यात ज्ञानेश कुमार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संपूर्ण भाजपा सहभागी आहे,” असा दावा आपचे खासदार सिंह यांनी केला.
