दिल्ली पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका मोटरसायकल स्वाराचा मृत्यू झाला असून एकजण जखमी असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. ही घटना शनिवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास दिल्लीतील विंडसर या भागात घडली. मोटरसायकल स्वारांचा घोळका रस्त्यावर धोकादायक स्टंट करत असताना पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी, पोलीस अधिका-यांनी मोटारसायकचे चाक पंक्चर करण्यासाठी केलेल्या गोळीबारात मोटारसायकलवर मागे बसलेल्या करण पांडेच्या पाठीला गोळी लागली आणि पुनित शर्मा नामक तरुण जखमी झाला. या दोघांनाही राम मनोहर लोहिया रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी करणचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. पुनितची चाचणी केली असता त्याने मद्यपान केले असल्याचे आढळले, असे पोलिसांनी सांगितले आहे.
३० तरुणांची एक तुकडी विंडसर भागात मोटरसायकल स्टंट करत असल्याची माहिती मिळताच दिल्ली पोलीस घटनास्थळी गेले. पोलिसांनी स्टंट थांबवण्याची ताकीद तरुणांना दिली. मात्र, तरुणांनी त्यांच्यावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. यामध्ये पोलिसांच्या गाडीचे नुकसान झाले. तेव्हा पोलिसांनी तरुणांना इशारा देण्यासाठी हवेत गोळीबार केला. त्यानंतरही त्यास न जुमानता या तरुणांनी रस्त्यावरील मोटारसायकल स्टंट थांबविले नाहीत. त्यामुळे गाडीचे चाक पंक्‍चर करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्याने केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला.
यामध्ये, काही पोलीसही जखमी झाले आहेत.