नवी दिल्ली : सत्ताधारी भाजप आणि विरोधकांच्या गदारोळात केंद्र सरकार सभागृहांमध्ये विधेयके संमत करून घेत आहे. बुधवारीही लोकसभेमध्ये मक्तेदारी दुरुस्ती विधेयक आवाजी मतदानाने मंजूर झाले. केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांनी वन संरक्षण दुरुस्ती विधेयक लोकसभेत मांडले. शिवाय संयुक्त समितीच्या शिफारशींनंतर तयार करण्यात आलेले जैवविविधता विधेयकही चर्चेसाठी पटलावर ठेवले गेले.
राहुल गांधी आणि अदानी या दोन्ही मुद्दय़ांवरून संसदेच्या दोन्ही सदनांमध्ये बुधवारीही गोंधळ सुरू राहिला. त्यामुळे लोकसभेचे कामकाज सकाळच्या सत्रात लगेचच तहकूब करण्यात आले. दुपारी बारानंतर मक्तेदारी दुरुस्ती विधेयक मंजूर केल्यानंतर सभागृह तहकूब करण्यात आले. राज्यसभा दुपारी दोन वाजेपर्यंत व त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब केली गेली. संसदेच्या दोन्ही सदनांमध्ये वित्त विधेयक आवाजी मतदानाने मंजूर झाले आहे.
चार दिवस सुट्टी
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाला सलग चार दिवस सुट्टी असून पुढील आठवडय़ात सोमवारी संसद सदस्य एकत्र येतील. विरोधक प्रामुख्याने काँग्रेसचे सदस्य बुधवारीही काळे कपडे घालून कामकाजात सहभागी झाले. तृणमूल काँग्रेसने राहुल गांधींच्या मुद्दय़ावर काँग्रेसला पाठिंबा दिला असून दररोज संसदभवनामध्ये होणाऱ्या बैठकीत हा पक्ष सहभागी होत आहे. तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी संसदेच्या आवारातील डॉ. आंबेडकरांच्या पुतळय़ासमोर ‘लोकशाही बचाव’च्या घोषणा देत केंद्र सरकारचा निषेध केला.
सोनिया-राहुल यांच्याशी राऊत यांची चर्चा
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली असली तरी ते बुधवारी संसदभवनात आले होते. काँग्रेस खासदारांच्या चर्चेत सहभागी झाल्यानंतर सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी ठाकरे गटाचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. या भेटीनंतर, विविध मुद्दय़ांवर चर्चा झाल्याचे राऊत यांनी सांगितले. सावरकरांच्या मुद्दय़ावरून काँग्रेस व ठाकरे गटामध्ये मतभेद निर्माण झाले होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मध्यस्थीने या दोन्ही पक्षांमध्ये समेट झाला आहे.