अहमदाबाद : गुजरातच्या कच्छ, सौराष्ट्र भागाला तडाखा दिलेल्या बिपरजॉय चक्रीवादळात कोणतीही जिवितहानी झाल्याचे वृत्त अद्याप प्राप्त झाले नसले तरी, या वादळाने मोठय़ा प्रमाणावर विध्वंस घडविला आहे.

१००० गावे अंधारात : या भागातील ५,१२० वीजखांब वादळात मोडून पडल्याने ४,६०० गावांतील वीजपुरवठा बंद पडला होता. त्यापैकी ३,५८० गावांतीत वीजपुरवठा सुरळीत करण्यात यश आले असले तरी, एक हजार गावांत अद्याप वीज नाही.

तीन महामार्गावरील वाहतूक ठप्प  : परिसरात सुमारे ६०० झाडे उन्मळून पडली. अन्य अडथळय़ांमुळेही तीन राज्य महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. वादळामुळे किमान २३ जण जखमी झाले. अनेक घरांचे नुकसान झाले.

रात्री अडीचपर्यंत थैमान : या भागात सुमारे १४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहत होते. सोबत जोरदार पाऊसही होता. शिवाय समुद्राचे पाणी किनाऱ्यावरील काही गावांमध्ये शिरले होते. जखाऊ बंदर भागात गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजता चक्रीवादळाने भूस्पर्श करण्याची प्रक्रिया सुरू झाली, तेव्हापासून संपूर्ण कच्छ जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. हे वादळी पावसाचे थैमान पहाटे रात्री अडीच वाजेपर्यंत सुरू होते.

शेळय़ा वाचवताना दोन मेंढपाळांचा मृत्यू

दरम्यान, भावनगर जिल्ह्यात पुरात अडकलेल्या शेळय़ांची सुटका करण्याच्या प्रयत्नात दोन मेंढपाळांचा मृत्यू ओढवला. ते पिता-पूत्र होते. पण, हा जिल्हा संभाव्य चक्रीवादळग्रस्त भाग म्हणून जाहीर केला नव्हता. त्यामुळे या मृत्यूंची नोंद वादळबळी म्हणून करण्यात आलेली नाही, अशी माहिती राज्य मदत आयुक्त अलोक कुमार पांडे यांनी गांधीनगरमध्ये पत्रकारांना दिली.  दरम्यान दिल्लीत एनडीआरएफतर्फे सांगण्यात आले की हे दोन मृत्यू वादळाने भूस्पर्श करण्याची प्रक्रिया सुरू करण्याआधीच घडले. भूस्पर्श प्रक्रिया सुरू झाल्यानंतर एकही मृत्यू झाल्याची नोंद अद्याप नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एनडीआरएफची १८ पथके, कच्छमध्ये सर्वाधिक हानी

वादळग्रस्त भागात बचाव आणि मदत कार्यासाठी एनडीआरएफची १८ पथके तैनात केली आहेत. त्यांच्याकडे रबरी बोटीही आहेत. त्याशिवाय अशीच पाच पथके मुंबईत आणि चार कर्नाटकात तैनात केली आहेत,  अशी माहिती एनडीआरएफचे महासंचालक अतुल करवार यांनी दिल्लीत पत्रकारांना दिली. कच्छ जिल्ह्यात वादळाने अधिक हानी झाली आहे. वीजपुरवठा खंडित झालेल्या गावांपैकी ४० टक्के गावे याच जिल्हातील आहेत, असे त्यांनी सांगितले.