त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांनी शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रिपुरा भाजपाचे प्रमुख माणिक साहा राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून विराजमान होण्याची शक्यता आहे.

पुढील वर्षी त्रिपुरामध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर त्रिपुरातील भाजपाचे पहिले मुख्यमंत्री बिप्लब देब यांनी शनिवारी राजीनामा दिला आहे. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, “त्रिपुरामध्ये भाजपाला दीर्घकाळ सत्तेत ठेवण्याची गरज आहे.” त्यामुळे मी आपल्या पदाचा राजीनामा देत आहे. त्यांनी पुढे म्हटलं की, “पक्ष हा सर्वात वर आहे. मी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली पक्षासाठी काम केलं. मी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून त्रिपुरातील जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला. मी शांतता, विकास आणि राज्याला कोविड संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले.”

प्रसारमाध्यमांशी बोलताना ते पुढे म्हणाले की, “प्रत्येक गोष्टीला एक कालमर्यादा असते. आपण त्या कालमर्यादेनुसार काम करत असतो. बिप्लब देब कोणतीही जबाबदारी सहजपणे पेलू शकतात. मग ती मुख्यमंत्री पदाची असो वा इतर कोणतीही,” असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

बिप्लब कुमार देब यांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नवी दिल्लीत भेट घेतली होती. त्यानंतर एकाच दिवसात त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या राजीनाम्याबाबतचा निर्णय भाजपाच्या नेतृत्वाकडून घेण्यात आला आहे. बिप्लब देब यांच्या राजीनाम्यानंतर नवीन मुख्यमंत्री निवडला जाणार आहे.

त्रिपुराचा राजकीय विकास, मुख्यमंत्र्यांनी दिला राजीनामा आणि नवीन नेता निवडला जाणार आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि भाजपाचे सरचिटणीस विनोद तावडे यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून ते आगरतळा येथे पोहोचले आहेत.