राफेल विमानांच्या खरेदीच्या व्यवहारावरून काँग्रेस आणि भाजप यांच्यात गुरुवारी वाग्युद्ध झडले. एका उद्योगपतीच्या फायद्यासाठी हा संपूर्ण व्यवहार बदलल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला, मात्र भाजपने हा आरोप साफ फेटाळून लावला.

मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचा मुलगा जय याच्या कंपनीच्या उलाढालीत प्रचंड वाढ झाल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुणीच प्रश्न का विचारले नाहीत, अशीही विचारणा राहुल यांनी केली.

तुम्ही मला अनेक प्रश्न विचारता आणि मी त्या सर्वाची उत्तरे देतो. पण राफेल सौद्याबाबत तुम्ही मोदी यांना प्रश्न का विचारत नाही? अमित शाह यांच्या मुलाबाबत तुम्ही का प्रश्न विचारत नाही? एका उद्योगपतीच्या फायद्यासाठी संपूर्ण राफेल सौदा बदलणाऱ्या पंतप्रधानांना तुम्ही प्रश्न का विचारत नाही, असेही राहुल यांनी नव्याने स्थापित करण्यात आलेल्या अ. भा. असंघटित कामगार काँग्रेसच्या (एआययूडब्ल्यूसी) बैठकीनंतर पत्रकारांना विचारले.

काँग्रेस ज्या वेळी असे प्रश्न उपस्थित करते त्या वेळी त्यांना त्यांच्या कारकीर्दीची आठवण येते, असे सांगून भाजपचे वरिष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी गांधी यांच्या विधानांचा प्रतिवाद केला. नरेंद्र मोदी सरकारच्या तीन वर्षांच्या कार्यकाळात भ्रष्टाचाराचे एकही प्रकरण घडले नाही ही बाब पचवणे त्यांना कठीण जात आहे, असे राहुल यांच्या आरोपांबाबत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात प्रसाद यांनी सांगितले.

  • राफेल सौद्याचा मुद्दा या आठवडय़ाच्या सुरुवातीला वादाचा केंद्रबिंदू ठरला होता.
  • सरकार राष्ट्रीय हित व सुरक्षा यांच्याशी तडजोड करून देशाच्या राजकोषाचे नुकसान करीत आहे, असा आरोप काँग्रेसने केला होता.
  • काँग्रेसच्या बडय़ा नेत्यांची अगुस्ता वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर घोटाळ्यात चौकशी होण्याची भीती असल्यामुळे लक्ष विचलित करण्यासाठी काँग्रेस हे आरोप करीत असल्याचा प्रतिहल्ला भाजपने चढवला होता.