भारतीय जनता पक्षाचा पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांचे नाव जाहीर करण्याबाबत पक्षनेतृत्त्व ठाम असल्याचे सूत्रांनी सांगितले. पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा या घोषणेला विरोध आहे. त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्नही पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या दोन्ही पातळ्यांवर करण्यात आले. मात्र, त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने अडवाणींचा विरोध डावलून मोदी यांचे नाव जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे.
पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवरून पक्षामध्ये कोणतेही मतभेद नसल्याचे पक्षाचे अध्यक्ष राजनाथसिंह यांनी गुरुवारी पत्रकारांना सांगितले. पक्षात कोणतेही मतभेद नाहीत…एवढेच मला सांगायचे आहे, असे राजनाथ सिंह म्हणाले. राजनाथ सिंह यांनी स्वतः बुधवारी अडवाणी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. मात्र, अडवाणी यांची नाराजी दूर करण्यात त्यांना यश मिळाले नसल्याचे सूत्रांनी सांगितले. पक्षाच्या संसदीय मंडळाची बैठक बोलावण्यात येणार आहे का, असे पत्रकारांनी विचारल्यावर त्याबद्दल तुम्हाला माहिती देण्यात येईल, असे राजनाथ सिंह म्हणाले.
मोदी यांच्या उमेदवारीला लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांचाही विरोध असल्यामुळे त्यांची मनधरणी करण्यासाठी पक्षाचे ज्य़ेष्ठ नेते अनंतकुमार यांनी त्यांची भेट घेतली. राजनाथ सिंह यांनीही बुधवारी रात्री स्वराज यांची भेट घेतली होती. त्याचबरोबर त्यांनी मुरली मनोहर जोशी यांचीही भेट घेतली.