पुणे : शहर विकासाचा भाजपचा दावा खोटा आहे. विकासाबाबतची खोटी माहिती भारतीय जनता पक्षाकडून दिली जात आहे, असा आरोप काँग्रेसचे पुण्यातील उमेदवार मोहन जोशी यांनी शुक्रवारी प्रचारफेरीदरम्यान केला. दरम्यान, संविधानविरोधी मोदी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या दलित-अल्पसंख्याक आघाडीकडून खास जनजागरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. यानिमित्ताने झोपडपट्टी आणि मोहल्ल्यांमध्ये जाऊन आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करण्यात येणार आहे.

काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे, आरपीआय कवाडे गटाचे प्रकाश भालेराव या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये जनजागरण मोहिमेची घोषणा करण्यात आली.

लोकसभा निवडणूक ही धर्माध आणि पुरोगामी विचारांची लढाई आहे. मोदी सरकारच्या राजवटीत विशिष्ट धर्माच्या लोकांना तसेच मागासवर्गीयांना सापत्न वागणूक दिली जात आहे. धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊ नये यासाठी दलित-अल्पसंख्याक आघाडीकडून ही मोहीम राबविण्यात येणार आहे, असे बागवे यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमदेवार मोहन जोशी यांच्या प्रचारासाठी फेरी काढण्यात आली. विश्रांतवाडी येथून फेरीला प्रारंभ झाला. शहराच्या विकासासाठी कोटय़वधी रुपये आणल्याचे सांगणाऱ्या भाजपला पुणेकर धडा शिकवतील, असे मोहन जोशी यांनी यावेळी सांगितले. धानोरीगाव, गोकुळनगर, टिंगरेनगर, कलवड, खेसे पार्क, वडगाव शिंदे, निरगुडी लोहगाव या मार्गे प्रचारफेरी काढण्यात आली. युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित युवा बेरोजगार मेळाव्यातही भारतीय जनता पक्षावर टीका करण्यात आली.