गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे राजकारण व्यक्तिकेंद्रित असून ते देशाच्या हिताचे नाही, ही काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेली टीका हास्यास्पद असल्याचे भाजपने म्हटले आहे. ज्या पक्षाने घराणेशाहीचे राजकारण केले आणि नेहमी आपल्या कुटुंबीयांचेच हित जपले, त्या पक्षाकडून दुसरी कोणती अपेक्षा करणार, असेही भाजपने म्हटले आहे.
देशाला आता बदल हवा असून राहुल गांधी यांची क्षमता आणि बुद्धिमत्ता देशाने जोखली आहे आणि ती फेटाळलीही आहे, असे भाजपचे नेते रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे. काँग्रेस पक्ष घराणेशाहीवरच चालला असून विशिष्ट कुटुंबीयांसाठीच निर्णय घेतले जात आहेत तो पक्ष देशाच्या हिताचा विचार करू शकत नाही, असे भाजपच्या प्रवक्त्या मीनाक्षी लेखी यांनी म्हटले आहे.
काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून राहुल गांधी यांच्या नावाची घोषणा होईल. कारण काँग्रेस पक्ष गांधी कुटुंबीयांच्या पलीकडे विचारच करू शकत नाही अशी टीकाही केली.