scorecardresearch

राहुल गांधींच्या वैष्णोदेवी दर्शनानंतर भाजपानं गंगाजल टाकून यात्रामार्गाचं केलं ‘शुद्धीकरण’!

राहुल गांधी यांच्या वैष्णोदेवी यात्रेनंतर भाजपानं या मार्गाचं गंगाजल टाकून शुद्धीकरण केल्याचा प्रकार समोर आला आहे.

राहुल गांधींच्या वैष्णोदेवी दर्शनानंतर भाजपानं गंगाजल टाकून यात्रामार्गाचं केलं ‘शुद्धीकरण’!
राहुल गांधी यांनी वैष्णोदेवी दर्शनासाठी १३ किलोमीटर पायी प्रवास केला (संग्रहीत छायाचित्र)

गेल्या आठवड्यात काँग्रेस नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी वैष्णोदेवीला १३ किलोमीटर पायी चालत जाऊन दर्शन घेतलं. राजकीय वर्तुळासोबतच नेटिझन्समध्ये देखील राहुल गांधींच्या या देवी दर्शनाची आणि १३ किलोमीटर पायी प्रवासाची चर्चा रंगली होती. मात्र, राहुल गांधींच्या या प्रवासानंतर भाजपानं ते गेलेल्या मार्गाचं गंगाजल टाकून शुद्धीकरण केल्याचा प्रकार समोर आला आहे. इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार, जम्मू-काश्मीर भारतीय जनता युवा मोर्चा (BJYM) अर्थात भाजपाच्या काश्मीरमधील युवा संघटनेने हे शुद्धीकरण केलं असून त्यावरून आता देशाच्या राजकीय वर्तुळात उलट-सुलट प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाला नारायण राणेंनी भेट दिल्यानंतर काही स्थानिक शिवसेना कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणाचं शुद्धीकरण केलं होतं. त्यानंतर राज्यात देखील मोठी चर्चा झाली होती.

बीजेवायएमचे जम्मू-काश्मीरमधील प्रमुख अरुण जामवाल यांनी ही सगळी शुद्धीकरणाची प्रक्रिया केली. “राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वैष्णोदेवी स्थानाचं पावित्र्य भंग केलं आहे. राहुल गांधी आणि त्यांच्या पक्ष कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे झेंडे यात्रा मार्गावर फडकावले. तसेच, राजकीय घोषणाबाजी देखील केली”, असा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे.

 

“मी काश्मिरी पंडित; माझ्या सर्व बंधूंना आश्वासन देतो की…”; जम्मू-काश्मीर दौऱ्यात राहुल गांधींचं विधान

गेल्या आठवड्यात राहुल गांधी यांनी दोन दिवसांचा जम्मू-काश्मीर दौरा केला होता. यावेळी त्यांनी पायी चालत जाऊन वैष्णोदेवी मंदिरात दर्शन घेतलं. यावेळचा व्हिडीओ देखील काँग्रेसनं आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवर शेअर केला होता.

 

दरम्यान, यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना राजकीय प्रश्नांची विचारणा केली असता “मी येथे देवीचं दर्शन घेण्यासाठी आणि प्रार्थनेसाठी आलो आहे. मला कोणतंही राजकीय भाष्य करायचं नाहीये,” असं राहुल गांधी यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या