भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांचे ट्विटर अकाऊंट तुर्किश आर्मी ग्रुप या हॅकर ग्रुपने हॅक केल्याची माहिती समोर येते आहे. राम माधव यांच्या ट्विटर अकाऊंटमधली सगळी माहिती आमच्याकडे गोळा केली आहे. त्यांचे अकाऊंट आम्ही हॅक केले आहे. असा संदेश या ट्विटर अकाऊंटवर येतो आहे. तसेच I love pakistan असे लिहून हे अकाऊंट आम्हीच हॅक केले असल्याचे तुर्किश आर्मी ग्रुपने म्हटले आहे.
आय सपोर्ट तुर्की या नावाने देखील एक ट्विट करण्यात आले आहे. तसेच इतर अनेक ट्विट या ग्रुपकडून आता राम माधव यांच्या नावे टाकण्यात येत आहेत. तासाभरापूर्वीच एक रिट्विट राम माधव यांनी केल्याचे दिसते आहे त्यानंतरचे सगळे ट्विट मात्र तुर्किश आर्मी ग्रुपने पोस्ट केले आहेत.
अनेक नेटकऱ्यांनी राम माधव यांचे अकाऊंट हॅक झाल्याचे म्हटले आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे कारण आता राम माधव यांच्या ट्विटर अकाऊंटवरून नेमके काय संदेश टाकले जातील याचे संपूर्ण नियंत्रण तुर्किश आर्मी ग्रुपकडे आहे. या ग्रुपने एक व्हिडिओ पोस्ट करून राम माधव यांचे अकाऊंट हॅक केल्याची माहिती दिली आहे. तसेच @rammadhavbjpTC या ट्विटर हँडलच्या खाली असलेली लिंकही बदलण्यात आली आहे. भाजपा नेते राम माधव यांचे हे अधिकृत ट्विटर अकाऊंट होते ते काही वेळापूर्वीच हॅक करण्यात आले आहे.
अभिनेते अनुपम खेर यांचेही ट्विटर अकाऊंट हॅक
तुर्किश आर्मी ग्रुपने अभिनेते अनुपम खेर यांचेही ट्विटर अकाऊंट हॅक केल्याची माहिती अनुपम खेर यांनी स्वतःच दिली आहे. रात्री मला काही मित्रांचे मेसेज आणि फोन आले त्यानंतर मला माझे ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याची माहिती मिळाली आहे. स्वप्नदास गुप्ता यांच्याकडून मला एक लिंक आली ती मी उघडल्यावर माझे अकाऊंट हॅक झाल्याची माहिती अनुपम खेर यांनी एएनआयशी बोलताना दिली. मी याबाबत तातडीने ट्विटरशी संपर्क साधला आणि त्यानंतर माझे अकाऊंट पूर्ववत झाले असेही खेर यांनी म्हटले आहे.