सुधारित नागरिकत्व कायद्यावरून देशात गदारोळ सुरू आहे. कायद्याला होत असलेल्या विरोधानंतर हा कायदा मुस्लीमविरोधी नसल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील सभेत म्हणाले होते. त्यानंतर भाजपाचे पश्चिम बंगालचे प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकुमार बोस यांनीच उलट सवाल करत कोंडीत पकडलं आहे. सुधारित नागरिकत्व कायद्याचा धर्माशी संबंध नाही, तर मुस्लीम वगळून इतर धर्मांचा उल्लेख का करता आहात?, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

सुधारित नागरिकत्व कायद्यावरून देशभरात संभ्रमाचे वातावरण आहे. देशातील इतर भागासह पश्चिम बंगालमध्ये एनआरसी आणि सीएए कायद्यावरून तृणमूल काँग्रेस आणि भाजपामध्ये तीव्र संघर्ष निर्माण झाला आहे. तृणमूल काँग्रेसनं दोन्ही कायद्याला विरोध केला असून, भाजपाकडून समर्थन केलं जात आहे.

दरम्यान, या कायद्यावरून पश्चिम बंगालमधील राजकीय संघर्ष टोकाला गेलेला असताना भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकुमार बोस यांनी थेट पक्षालाच सुनावलं आहे. या कायद्याचा धर्माशी संबंध नाही असं भाजपाकडून सांगितलं जात असून, बोस यांनी पक्षाच्या याच भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

बोस यांनी ट्विट केलं आहे. “जर CAA2019 कायदा कोणत्याही धर्माशी नाही, तर मग आपण हिंदू, शीख, बौद्ध, ख्रिश्चन, पारशी आणि जैन या धर्मांचा उल्लेख का करतो आहे? आपण मुस्लीम धर्माचा त्यात समावेश का केलेला नाही. चला पारदर्शक होऊ या,”अशा शब्दात बोस यांनी पक्षाची कानउघडणी केली आहे.

मोदी काय म्हणाले होते?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘एनआरसी’विषयी असत्य माहिती पसरवण्यात येत असल्याचे भाष्य करत, मुळात ही कल्पना आधीच्या काँग्रेस सरकारचीच आहे, असं मोदी म्हणाले होते. सुधारित नागरिकत्व कायदा आणि ‘एनआरसी’बद्दल भारतीय मुस्लिमांनी भीती बाळगण्याचे कारण नाही. माझे विरोधक मला लक्ष्य करण्यासाठी लोकांना भडकावून देशात दुही माजवण्याचा प्रयत्न करत आहेत. मुस्लिमांना स्थानबद्धता छावण्यांमध्ये (डिटेन्शन सेंटर्स) पाठवण्यात येईल, अशी अफवा काँग्रेस, काँग्रेसचे मित्रपक्ष आणि शहरी नक्षलवादी पसरवत असल्याचा आरोप मोदी यांनी केला होता.