BJP leader Rohit Saini: राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यातील किशनगड येथील भाजपा नेता रोहित सैनीने त्याची प्रेयसी रितू सैनीच्या सांगण्यावरून पत्नी संजू सैनीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. १० ऑगस्ट रोजी सदर गुन्हा घडला होता. मात्र हत्या केल्यानंतर दरोड्याचा बनाव केल्यामुळे पोलिसांची दिशाभूल करण्यात आली होती. मात्र पोलिसांनी कसून तपास करत आता रोहित सैनी आणि प्रेयसी रितूला अटक केली आहे.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक दीपक कुमार यांनी माहिती दिल्यानुसार आता दोन्ही आरोपींची अटक करण्यात आली आहे. सुरूवातीला पोलिसांची दिशाभूल केल्यानंतर पुढील २४ तासांत पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला.
१० ऑगस्ट रोजी संजू संशयास्पद परिस्थितीत मृतावस्थेत आढळी होती. सुरुवातीला पती रोहित सैनीने दावा केला की, अज्ञात दरोडेखोरांनी त्याच्या पत्नीची हत्या केली आणि घरातील मौल्यवान वस्तू घेऊन पळाले. तथापि, पोलिसांनी तपास केला असता रोहित सैनीच्या जबाबात त्यांना विसंगती आढळली. सखोल चौकशी केल्यानंतर रोहितने हत्येची कबुली दिली आणि मग त्याने रचलेला कट उघड झाला.
प्रेयसीच्या सांगण्यावरून पत्नीची हत्या
पोलिसांच्या तपासानुसार, रोहितने कबूल केले की, त्याने प्रेयसीच्या सांगण्यावरून पत्नीची हत्या केली. तपासात पुढे असे दिसून आले की, रोहित आणि रितू अनेक वर्षांपासून संबंधात होते. त्याची पत्नी या संबंधात अडथळा ठरत होती. रितूने पत्नी संजूला बाजूला करण्यासाठी रोहितवर दबाव टाकला होता. यासाठी रोहितने पत्नीची निर्घृण हत्या केली. तसेच दरोड्याची बतावणी करून पोलिसांची दिशाभूल केली.
पोलिसांनी रोहित सैनी आणि रितू सैनी या दोघांना अटक केली असून त्यांची आणखी चौकशी सुरू आहे.