हाथरस प्रकरणामुळे भाजपाची प्रतिमा मलीन झाली आपण नुकतंच प्रभू रामचंद्रांच्या मंदिरांचं भूमिपूजन केलं आहे. मात्र हाथरसमध्ये घडलेली घटना त्यानंतर पोलिसांच्या कारवाईबाबत समोर आलेलं प्रश्नचिन्ह या सगळ्यामुळे योगी सरकार आणि भाजपाची प्रतिमा मलीन झाली आहे असं उमा भारती यांनी म्हटलं आहे. उमा भारती यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्विट करत त्यांचं मत मांडलं आहे. योगी आदित्यनाथ हे एक पारदर्शी सरकार चालवणारे मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात. त्यांनी प्रसारमाध्यमांना पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यापासून अडवू नये असंही आवाहन उमा भारती यांनी केलं आहे

उमा भारती यांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांना करोना रुग्णालयात ठेवण्यात आलं आहे. याबाबतचीही खंत त्यांनी त्यांच्या ट्विट्समध्ये बोलून दाखवली आहे. “मी करोना वॉर्डमध्ये अत्यंत अस्वस्थ आहे. मी करोना पॉझिटिव्ह नसते तर आज त्या गावातील त्या पीडितेच्या कुटुंबीयांसोबत त्यांच्या घरी बसलेले असते.” असंही त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे मी तुमच्या मोठ्या बहिणीसारखी आहे त्यामुळे तुम्ही माझा सल्ला ऐकावा असंही आवाहन उमा भारती यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना केलं आहे.