सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यामध्ये भाजपाचे एक खासदार एका नवोदित कुस्तीपटूला कानशिलात लगावताना दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित भाजपा खासदारांवर टीका केली जात आहे. या व्हिडीओमध्ये ६४ वर्षीय भाजपा खासदार ब्रिज भूषण शरण सिंह दिसत आहेत. उत्तर प्रदेशमधील कैसरगंज लोकसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. याआधी गोंदा लोकसभा मतदारसंघातून देखील ते एकदा निवडून आले आहेत.
काय आहे व्हिडीओमध्ये?
या व्हिडीओमध्ये ब्रिज भूषण शरण सिंह स्टेजवर बसलेले असताना एक किशोरवयीन कुस्तीपटू स्टेजवर येऊन त्यांच्याशी बोलताना दिसत आहे. मात्र, तेवढ्यात ब्रिजभूषण शरण सिंह यांनी उठून संतापात या मुलाच्या कानशिलात लगावल्याचं दिसून येत आहे. यावेळी स्टेजवरील इतर काही मान्यवरांनी ब्रिजभूषण शरण सिंह यांना अडवत मुलाची सुटका केली. सुमित कुमार नावाच्या एका ट्विटर युजरनं हा व्हिडीओ शेअर केला आहे.
नेमकं झालं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ज्या मुलाला ब्रिजभूषण यांनी कानशिलात लगावली, तो १५ वर्षांपेक्षा जास्त वयाचा आहे. ब्रिजभूषण प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेली ती स्पर्धा १५ पेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी होती. त्यामुळे या मुलाला अपात्र ठरवून स्पर्धेतून बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर या मुलानं स्टेजवर येत खासदार ब्रिजभूषण यांच्यासोबत बोलायला सुरुवात केली. स्पर्धेत खेळू देण्याविषयी तो त्यांना विनवू लागला. मात्र, त्यांच्यात झालेल्या चर्चेमुळे संतप्त झालेल्या खासदारांनी थेट मुलाच्या कानशिलात लगावली. या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याविषयी माहिती मिळू शकलेली नाही.
विषेश म्हणजे ब्रिजभूषण शरण सिंह हे रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष देखील आहेत. मात्र, सदर मुलाशी बोलताना त्यांचा पारा चढला आणि रागाच्या भरात त्यांनी भर कार्यक्रमात मुलाच्या कानशिलात लगावण्याचा प्रकार समोर आला आहे.