गेल्या वर्षी जून महिन्यात भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला केलेला विरोध चर्चेचा विषय ठरला होता. उत्तर भारतीयांबाबत राज ठाकरेंनी केलेल्या विधानांबद्दल जाहीर माफी मागितल्याशिवाय त्यांना अयोध्येत प्रवेश करू देणार नाही, अशी घोषणाच बृजभूषण सिंह यांनी केली होती. त्यामुळे तणवपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. आता त्याच बृजभूषण सिंह यांनी आपलं राज ठाकरेंशी वैयक्तिक भांडण नव्हतं, त्यांनी एक प्रकारे उत्तर भारतीयांचा सन्मानच केला आहे, असं विधान केलं आहे.
उत्तर प्रदेशचे भाजपा खासदार बृजभूषण सिंह हे गेल्या काही काळापासून चर्चेत आले आहेत. महिला कुस्तीपटूंनी त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप लावल्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची टांगती तलवार असताना टीव्ही ९ शी बोलताना त्यांनी राज ठाकरेंच्या प्रश्नावर सविस्तर भूमिका मांडली आहे. यात आता राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध नसून ते आले तर त्यांचं स्वागतच आहे, असं बृजभूषण सिंह यांनी स्पष्ट केलं आहे.
“अयोध्येला न येऊन त्यांनी सन्मान केला”
तेव्हा अयोध्येला येणं टाळून राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांचा सन्मान केल्याचं बृजभूषण सिंह म्हणाले आहेत. “राज ठाकरेंशी माझं काही वैयक्तिक भांडण नाही. त्या वेळी मी उत्तर भारतीयांच्या मुद्द्यावर म्हटलं होतं की त्यांनी माफी मागावी आणि मग इकडे यावं. पण त्यांनी इथे न येऊन एक प्रकारे आमचा सन्मान केला आहे. त्यामुळे मोठा वाद टळला. आता मला वाटतं की ते जर आले तर मला कोणताही आक्षेप नाही. कुणालाच कोणता आक्षेप नाही”, असं बृजभूषण सिंह यांनी स्पष्ट केलं आहे.
“राज ठाकरेंनी स्वत:च्या तोंडून खेद व्यक्त केला नसला तरी..”
“तेव्हा वाद टाळून त्यांनी उत्तर भारतीयांचा एक प्रकारे सन्मानच केला. ते जरी स्वत:च्या तोंडून खेद व्यक्त करू शकले नाहीत किंवा दिलगिरी व्यक्त करू शकले नाहीत तरी न येणं हा एक प्रकारे उत्तर भारतीयांचा सन्मानच आहे. आता मला राज ठाकरेंच्या बाबतीत काहीही म्हणायचं नाही. जशी अयोध्या आमची आहे, तशीच ती राज ठाकरेंचीही आहे. त्यांनी इकडे यावं, त्यांचं स्वागतच आहे”, असंही बृजभूषण सिंह यावेळी म्हणाले.
राज ठाकरे आणि बृजभूषण सिंह यांच्यातील वाद मिटला? मनसे नेत्याचं सूचक विधान
गेल्या वर्षी ५ जून रोजी राज ठाकरे अयोध्येला जाणार असल्याचं मनसेकडून जाहीर करण्यात आलं होतं. मात्र, बृजभूषण सिंह यांनी अयोध्येत राज ठाकरेंना प्रवेश करू देणार नाही, असं जाहीर आव्हानच दिल्यामुळे वातावरण चिघळण्याची शक्यता निर्माण झाली होती. राज ठाकरेंनी तेव्हा अयोध्या दौरा पुढे ढकलला होता. त्यांच्या शस्त्रक्रियेसाठी दौरा पुढे ढकलण्यात आल्याचंही नंतर सांगण्यात आलं.