तंबाखूने कर्करोग होतो असे भारतातील एकाही अभ्यासात सिद्ध झालेले नाही असे खासदार दिलीप गांधी यांच्या नेतृत्वाखालील समितीने म्हटल्यानंतर आता तेझपूरचे राम प्रसाद सरमाह यांनी आणखी आग ओकली असून सिगरेटमुळे कर्करोग होत असल्याचे कुठलेही पुरावे नसल्याचे म्हटले आहे
तंबाखूविरोधी कायद्याच्या उपसमितीचे सदस्य असलेल्या सरमाह यांनी सांगितले की, तंबाखू विकण्याबाबत देशामध्ये नियम आहेत, तंबाखूमुळे कर्करोग होतो की नाही याचे पुरावे मिळवले पाहिजेत. धूम्रपानामुळे कर्करोग होतो असे पुरावे मिळवणे अवघड आहे असे सांगून ते म्हणाले की, तंबाखूमध्ये वनौषधी असतात की नाही याचाही शोध घेतला पाहिजे. त्यामुळे आम्ही हा विषय आता डॉक्टरांच्या बैठकीत ठेवण्याचे ठरवले असून त्यासाठी काही रासायनिक पुरावे आहेत की नाही हे विचारले आहे. आम्ही धूम्रपानाच्या विरोधात व बाजूने नाही पण धूम्रपानामुळे खरोखर कर्करोग होतो की नाही हे बघितले पाहिजे.
आपल्याला दोन वरिष्ठ वकील माहीत आहेत ज्यांच्यापैकी एकजण ६० सिगरेट ओढत असे व नंतर एक बाटली दारू पीत असे तर दुसरा रोज चाळीस सिगरेट ओढत असे व दारूही पीत असे पण त्यांना कर्करोग झाला नाही हे दोघे अनुक्रमे ८० व ७५ वर्षे जगले असे सरमाह यांनी सांगितले
 भाजपचे खासदार दिलीप गांधी यांच्यानंतर भाजपचे अलाहाबाद येथील खासदार श्यामशरण गुप्ता हे बिडी सम्राट असून तेही संसदीय समितीचे सदस्य असताना त्यांनी बिडी पिणारे पण आजपर्यंत कुठलाही रोग न झालेले अनेक लोक आपण आणून दाखवू असे विधान केले होते. तुम्हाला साखर, भात व बटाटय़ांनी मधुमेह होतो याची जाणीवही त्यांनी करून दिली.
विरोधी पक्षांनी तंबाखू व कर्करोगाबाबतच्या विधानांवर टीका सुरू ठेवली असून जनता दल संयुक्तने हा हितसंबंधांचा मुद्दा बनला असून समितीनेच आता गुप्ता यांना समितीत ठेवावे की नाही याचा निर्णय घ्यावा. भारतीय वैद्यक संशोधन संस्थेने केलेल्या शेकडो अभ्यासात तंबाखूमुळे कर्करोग होतो व मूत्रपिंड, फुफ्फुसे व  मेंदू धोक्यात येतो असे म्हटले आहे. पीएमकेचे रामदोस यांनी सांगितले की, तंबाखू व सिगरेटच्या पाकिटावरील धोकादर्शक चित्रे ८५ टक्के मोठी करण्याच्या निर्णयापासून आरोग्य मंत्रालयाला अंधारात ठेवण्यात आले. तंबाखू दबावगटाच्या विरोध उभे राहण्याची हिंमत आता आरोग्यमंत्री नड्डा यांनी दाखवायला हवी.