शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चपलेने मारहाण केल्याचे प्रकरण देशभरात गाजत असताना आता आणखी एका खासदाराचा प्रताप समोर आला आहे. बिहारमधील पाटण्यामध्ये सामान्य लोकांना व्हिव्हिआयपी कल्चरचा फटका बसला आहे. पाटण्यातील जयप्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवाशांना भाजप खासदार हुक्मदेव यादव यांच्यामुळे मनस्तापाला सामोरे जावे लागले आहे. विमानतळापासून विमानापर्यंत जाण्यासाठी हुकूमदेव यादव यांना एकट्याला संपूर्ण बस पुरवण्यात आल्याने सामान्य प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

हुकूमदेव यादव माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये मंत्री होते. रविवारी हुकूमदेव यादव जेट एअरवेजच्या विमानाने पाटण्याहून नवी दिल्लीला जात होते. यावेळी हुकूमदेव यादव यांना विमानतळावरुन विमानापर्यंत नेण्यासाठी एक बस पुरवण्यात आली होती. या बसमधून हुकूमदेव यादव एकटेच विमानापर्यंत गेले, तर इतर सर्व प्रवाशांना विमानापर्यंत पोहोचण्यासाठी काही वेळ वाट पाहावी लागली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.

‘पंतप्रधान किंवा राष्ट्रपतींना विशेष वागणूक दिल्यास समजून घेता येऊ शकते. मात्र अशाच प्रकारची वागणूक प्रत्येक खासदाराला देणे हे संतापजनक आणि आक्षेपार्ह आहे,’ अशी प्रतिक्रिया एका प्रवाशाने दिली आहे. मधुबनी मतदारसंघाचे पाचव्यांदा संसदेत प्रतिनिधीत्व करत असलेले हुकूमदेव यादव यांनी मात्र आपण कोणत्याही प्रकारची विशेष वागणूक दिली जावी, असा आग्रह धरला नव्हता, असे स्पष्टीकरण दिले. ‘मला एकट्याला प्रवास करण्यासाठी बस का पुरवण्यात आली, हा प्रश्न तुम्ही जेट एअरवेजला आहे. त्या बसमधून मी एकटा प्रवास करत होतो, याची मला कल्पनादेखील नव्हती,’ असे हुकूमदेव यादव यांनी म्हटले.

आपली प्रतिमा डागाळण्यासाठी विरोधकांकडून विनाकारण आरोप केले जात असल्याचे हुकूमदेव यादव यांनी म्हटले. ‘उपराष्ट्रपती पदासाठी माझे नाव चर्चेत असल्याने प्रतिमा मलीन करण्यासाठी विरोधकांकडून नाहक आरोप केले जात आहेत,’ अशी प्रतिक्रिया हुकूमदेव यादव यांनी दिली आहे. पाटणा विमानतळ याआधीही अनेकदा नकारात्मक कारणांमुळे चर्चेत राहिले आहे.