पीटीआय, नवी दिल्ली

ऐन मतदानाच्या तोंडावर बिहारमधील १.२ कोटी महिलांना देण्यात आलेली प्रत्येकी १० हजार रुपयांची रोजगाराभिमुख मदत, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या मागे भारतीय जनता पक्षाने उभी केलेली संघटित ताकद, विस्कळीत विरोधी आघाडी, राष्ट्रीय जनता दलाचे मुस्लीम-यादव मतपेढीचे फसलेले गणित या घटकांमुळे बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप-संयुक्त जनता दलप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) शुक्रवारी अभूतपूर्व विजय मिळवला.

विधानसभेच्या २४३ जागांपैकी एनडीएने दोनशेहून अधिक जागांवर विजय किंवा निर्णायक आघाडी मिळवली. तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील विरोधी ‘महागठबंधन’ला जेमतेम ३५ जागांवर विजय मिळवता आला. काँग्रेसला दोन आकडी जागाही मिळवता आल्या नाहीत. राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाला भोपळा फोडता आला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता आणि प्रचारातील प्रभाव पुन्हा दिसून आला. तसेच संयुक्त जनता दलाचे नेते नितीश कुमार यांची ‘सुशासनबाबू’ अशी प्रतिमा विजय मिळवण्यात महत्त्वाची ठरली. बिहारमधील सर्वच भागांमध्ये विरोधी पक्षीयांची पीछेहाट झाली.

या निकालाने हिंदी भाषक पट्ट्यात आपला प्रभाव कायम असल्याचे भाजपने दाखवून दिले. लोकसभा निवडणुकीनंतर हरयाणा, महाराष्ट्र आणि आता बिहार या तिन्ही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने विरोधकांना नेस्तनाबूत केले. मात्र यासाठी एरवी रेवडी संस्कृतीचा आधार घेणे भाग पडत असल्याचेही दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार या दोघांनीही वर्षभरापूर्वीच रेवडी संस्कृतीची थट्टा केली होती. लालूप्रसाद यांचे पुत्र तेजस्वी यादव यांना बऱ्याच विलंबानंतर विरोधी आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून सादर केले गेले. तोपर्यंत एनडीएने नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपदाचे भावी उमेदवार ठरवून प्रचार सुरूही केला होता. तेजस्वी निवडून आल्यास बिहारमध्ये पुन्हा जंगलराज येईल, असा प्रचार पंतप्रधानांसह अनेक नेत्यांनी केला, त्याचाही मोठा परिणाम विशेषत: महिला मतदारांवर दिसून आला.

भाजपचा मित्रपक्ष असलेल्या संयुक्त जनता दलाने गेल्या निवडणुकीच्या तुलनेत कामगिरीत लक्षणीय सुधारणा केली. याखेरीज चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती (रामविलास) तसेच हिंदुस्थानी अवाम मोर्चा (धर्मनिरपेक्ष) आणि राष्ट्रीय लोकमोर्चा या एनडीएच्या मित्रपक्षांनीही मोठे यश मिळवले. महिलांच्या मतदानाच्या संख्येत वाढ झाली. त्याचा फायदा एनडीएला झाला. सत्तेत येण्यासाठी ताकद लावलेल्या राष्ट्रीय जनता दलाला जेमतेम २५ जागा जिंकता आल्या. गेल्या निवडणुकीतील ७५ जागांवरून त्यांची ही घसरण झाली. विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक असलेल्या दहा टक्के जागा त्यांना जेमतेम मिळवता आल्या, यावरून त्यांचा पराभव किती दारुण हे स्पष्ट होते. तेजस्वी यादव यांना त्यांच्या राघोपूर या यादव कुटुंबीयांच्या पारंपरिक मतदारसंघात विजयासाठी झुंजावे लागले. आघाडीतील भारतीय कम्युनिस्ट पक्षाला (माले) जेमतेम दोन जागा जिंकता आल्या. भावी उपमुख्यमंत्री म्हणून घोषित केलेल्या मुकेश साहनी यांच्या विकासशील इन्सान पक्षाला एकही जागा मिळाली नाही.

राज्यातील जनतेने आम्हाला दणदणीत विजय मिळवून देऊन आमच्यावर विश्वास दर्शवला आहे. यासाठी जनतेचे आभार मानतो. रालोआच्या घटक पक्षांमुळेही हा विजय मिळाला आहे. चिराग पासवान, जितनराम मांझी आणि उपेंद्र कुशवाह यांच्या सहाय्याने बिहार अधिक प्रगती करेल आणि देशातील सर्वात विकसित राज्यांमध्ये समाविष्ट होईल. – नितीश कुमार, मुख्यमंत्री, बिहार