राहुल गांधी यांनी लोकसभेमध्ये केंद्रातील सत्ताधारी भाजपावर कठोर शब्दांमध्ये टीका केल्यानंतर त्यांच्यावर भाजपाकडून परखड शब्दांत निशाणा साधण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील लोकसभा आणि राज्यसभेतील आपल्या भाषणात राहुल गांधी आणि काँग्रेसवर निशाणा साधला होता. या पार्श्वभूमीवर देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांसाठी राजकीय वातावरण चांगलंच तापलं असताना आता भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी राहुल गांधींवर खोचक शब्दांत टीका केली आहे.
“मी एवढंच सांगेन की हे मर्यादित बुद्धीचे आहेत”
जे. पी. नड्डा यांनी राहुल गांधींच्या एका विधानाचा आधार घेत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. “राहुल गांधी म्हणतात बंदूक, हेलिकॉप्टर, लढाऊ विमानं खरेदी केल्यामुळे देश मजबूत होत नाही. बुद्धी अडचणीत पडते माझी. चिंता वाटायला लागते की हे काय बोल आहेत? काय विचार करत आहेत? मी तर एवढंच सांगेन की हे मर्यादित बुद्धीचे आहेत”, असं जे. पी. नड्डा म्हणाले आहेत.
“हे का खरेदी केलं जातंय, यामुळे देश मजबूत होत नाही. त्यांचे संरक्षण मंत्री ए. के. अँटनी राज्यसभेत म्हणायचे की मला हे सांगायला अजिबात लाज वाटत नाही की पाकिस्तानमधील पायाभूत सोयीसुविधा भारतापेक्षा चांगल्या आहेत आणि आपण यावर लक्ष दिलं नाही. लाज वाटेल तरी कशी? तुम्ही कामंच अशी केली आहेत”, असं देखील नड्डा म्हणाले.
“यांचं एकच ध्येय, मिशन-कमिशन!”
“यांनी एकच ध्येय ठेवलं होतं. मिशन-कमिशन. नो कमिशन-नो खरेदी, नो कमिशन-नो रफेल, नो कमिशन-नो चिनुक(हेलिकॉप्टर). ज्यात हात टाकला, तिथे भ्रष्टाचारच केला. हेच काम यांनी केलं, अजून काही नाही. आज भारत बुलेटप्रूफ जॅकेट घेत नाहीये, तर देत आहे”, असा आरोप नड्डा यांनी केला आहे.