कोलकाता : ‘सारे काही आलबेल आहे’, असे भासवण्याऐवजी भाजपने त्रुटी शोधण्याची गरज असल्याचे सांगून, पक्षाने आत्मपरीक्षण करावे असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय सचिव अनुपम हाजरा यांनी सोमवारी केले. भाजपचे खासदार अर्जुन सिंह हे आदल्या दिवशी तृणमूल काँग्रेसमध्ये परत गेल्याची पार्श्वभूमी त्यांच्या वक्तव्याला होती.
‘एखाद्याने पक्ष सोडला आणि याचा काहीच परिणाम होणार नाही असेच तुम्ही सांगत राहिलात, तर तो योग्य दृष्टिकोन नाही. त्याचा परिणाम होईल हे आपण मान्य करायला हवे आणि लोक भाजप सोडून का जात आहेत याबाबत आत्मपरीक्षण करायला हवे’, असे हाजरा यांनी ट्वीटरवर लिहिले.
कार्यकर्त्यांना एकत्र ठेवण्यात अपयशी ठरल्याबद्दल हाजरा हे राज्य नेतृत्वावर टीका करत आलेले आहेत. नगरपालिकांच्या निवडणुका जिंकणे पक्षाला कठीण आहे, अशा वेळी वरिष्ठ पदावर असलेल्या एखाद्या व्यक्तीने पक्ष सोडून जाण्याचा नक्कीच विपरीत परिणाम होईल, असे ते म्हणाले.
‘‘आपण वस्तुस्थिती मान्य करायला हवी. ती अमान्य करून काहीही साध्य होणार नाही. ‘सारे काही आलबेल’ हा दृष्टिकोन योग्य नाही’’, असे त्यांनी नंतर एका वृत्तवाहिनीला सांगितले.
भाजपच्या प्रदेश शाखेने अद्याप त्यांच्या वक्तव्यावर काही प्रतिक्रिया दिलेली नाही.