गुजरातमध्ये सध्या राज्यसभा निवडणुकीच्यानिमित्ताने मोठा घोडेबाजार पाहायला मिळत आहे. यासंदर्भात अब्दासा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार व प्रवक्ते शक्तीसिंह गोहील यांना भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. सध्या गुजरातमध्ये पूर परिस्थिती असूनही अनेक आमदार त्यांच्या मतदारसंघाबाहेर आहेत. कारण, भाजपकडून त्यांना आपल्या जाळ्यात ओढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भाजपने यापैकी अनेक आमदारांना १५ कोटी रूपये आणि आगामी निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी देण्याचे आमिष दाखवायला सुरूवात केली आहे. भाजपकडून अत्यंत खालच्या दर्जाचे राजकारण सुरू आहे. आमदारांना लक्ष्य करण्यासाठी त्यांना आयकर विभाग किंवा सीबीआयचे छापे टाकण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. आतापर्यंत गुजरातमध्ये कधीही असा प्रकार घडला नव्हता. मात्र, आता राज्यसभा निवडणुकीच्यानिमित्ताने हा प्रकार सुरू झाला आहे, असे शक्तीसिंह गोहील यांनी सांगितले.
सोनिया गांधी यांचे विश्वासू साथीदार आणि काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्या पराभवासाठी भाजपकडून शक्य त्या पर्यायांचा अवलंब केला जात आहे. काही दिवसांपूर्वी याचा अपेक्षित परिणाम दिसू लागला होता. राज्यसभेच्या जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीपूर्वीच काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरू झाले होते. यानंतर अनेक आमदार काँग्रेस पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चेला ऊत आला होता. या पार्श्वभूमीवर निवडणुकीपूर्वी आमदार फुटू नयेत यासाठी काँग्रेसनं आपल्या ४२ आमदारांना रातोरात विमानाने बंगळुरूच्या एका रिसॉर्टमध्ये हलवले होते. या आमदारांकडून त्यांचे मोबाईल फोन काढून घेण्यात आले असून त्यांना एकप्रकारे बंदिवासात ठेवल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला होता. मात्र, गोहील यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
अहमद पटेलांचा विजय कठिणच!; काँग्रेस आमदाराचा दावा
गुजरातमध्ये राज्यसभेच्या तीन जागा आहेत. गुजरात विधानसभेत एकूण १८२ आमदार आहेत. यामध्ये काँग्रेसचे ५७, मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे २ आणि संयुक्त जनता दलाच्या एका आमदाराचा समावेश आहे. त्यामुळे पक्षाकडे एकूण ६० मते असून निवडणुकीसाठी पक्षाला केवळ ४५ मतांची आवश्यकता आहे. गुजरात विधानसभेत काँग्रेसचे एकूण ५७ आमदार असले, तरी त्यातील सहा आमदारांनी मागील दोन दिवसांमध्ये राजीनामे दिले आहेत. यातील तीन आमदारांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
‘त्या’ भीतीनं काँग्रेसनं रातोरात ४० आमदारांना गुजरातहून बंगळुरूला केलं ‘शिफ्ट’
