लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर अमित शाह यांच्या खांद्यावर गृहमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भाजपामध्ये एक व्यक्ती एक पद या सूत्रावर काम केले जाते. त्यातच आता नवे पक्षाध्यक्ष कोण आणि अमित शाह कोणाची निवड करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच शाह यांनी 13 आणि 14 जून रोजी राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमधील पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे. ही बैठक दिल्लीत होणार असून पक्षसंघटनेतील निवडणुकांबाबतही याच चर्चा होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पक्षसंघटनेतील निवडणुका सर्व राज्यांमध्ये होणार असून हरियाणा, महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांना यातून वगळण्याची शक्यता आहे. या राज्यांमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही राज्ये वगळण्यात येऊ शकतात. राष्ट्रीय अध्यक्षांच्याच निवडणुकीपूर्वी या निवडणुका पार पडणार आहेत. या वर्षांच्या सुरूवातीलाच अमित शाह यांचा कार्यकाळ पूर्ण झाला होता. परंतु लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. दरम्यान, अमित शाह यांच्या खांद्यावर गृहमंत्रिपदाची जबाबदारी सोपवल्यानंतर ते आपल्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा देतील, असे मत अनेकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. परंतु यावर भाजपाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या दरम्यान, भाजपाने राष्ट्रीय स्तरावर सदस्यता मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच बूथ स्तरापासून राष्ट्रीय अध्यक्षांपर्यंत पुनर्रचना होण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्य कार्यकारिणीचे सदस्य अध्यक्षांची निवड करतील आणि त्यानंतर राष्ट्रीय कार्यकारिणीतील सहभागी नेते राष्ट्रीय अध्यक्षांच्या नावावर शिक्कामोर्तब करतील. दरम्यान, माजी केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांचे नाव राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आघाडीवर असल्याच्या चर्चा आहेत. तसेच अमित शाह हेच राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम पाहू शकतात आणि त्यांच्या मदतीसाठी कार्यकारी अध्यक्षांची निवड करण्यात येईल, अशाही शक्यता वर्तवण्यात येत आहेत.