२०१९ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आतापासूनच तयारीला सुरूवात केली आहे. त्यानुसार आता प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील तयारीकडे लक्ष देण्यासाठी पक्षाकडून विशेष टीमची नियुक्ती केली जाणार आहे. या टीममध्ये एका पूर्णवेळ कार्यकर्त्यासह निरीक्षकांचा समावेश असेल. अमित शहा स्वत: प्रत्येक राज्यात भेट देऊन तेथील बुथ स्तरावरच्या तयारीचा आढावा घेणार आहेत. त्यासाठी अमित शहा प्रत्येक लोकसभा मतदारसंघात १५ दिवस मुक्काम करणार आहेत. भाजपच्या दीनदयाळ विस्तार योजनेतंर्गत या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. या अभियानाचा भाग म्हणून आजपासून अमित शहा यांच्या जम्मू-काश्मीरच्या दोन दिवसीय दौऱ्याची सुरूवात झाली आहे. यानंतर ते आणखी चार राज्यांना भेटी देणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सूत्रांच्या माहितीनुसार, हे कार्यकर्ते २०१९ लोकसभा निवडणुकीची मतमोजणी पार पडेपर्यंत आपापल्या मतदारसंघात कार्यरत असतील. पक्षाकडून विविध लोकसभा मतदारसंघात तब्बल ६०० पूर्णवेळ कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे समजते. तब्बल साडेतीन लाख कार्यकर्त्यांमधून या ६०० कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली आहे. हे पूर्णवेळ कार्यकर्ते आपापल्या मतदारसंघातील प्रत्येक बुथवर साधारण १५ दिवस काम करतील. याशिवाय, अन्य चार हजार कार्यकर्त्यांनी सहा महिन्यांसाठी पक्षाचे काम करण्याची तयारी दाखविली आहे.
अमित शहा स्वत: या सगळ्यावर नजर ठेवणार आहेत. तर गुजरात, ओदिशा, तेलंगणा, लक्षद्वीप आणि पश्चिम बंगाल या पाच राज्यांमध्ये तर ते बुथ स्तरावरील निवडणूक प्रचाराचे व्यवस्थापन करतील. या सगळ्या तयारीची पाहणी करण्यासाठ अमित शहा पुढील तीन महिने देशभरात दौरा करणार आहेत. या दौऱ्यात अमित शहा १२० लोकसभा क्षेत्रांसाठी विशेष रणनीती आखणार आहेत. याशिवाय, ज्या ठिकाणी भाजप कमकुवत आहे, मात्र प्रयत्न केल्यास पक्षाला त्याठिकाणी यश मिळू शकते, अशा लोकसभा क्षेत्रांचीही यादी अमित शहा यांच्या देखरेखीखाली तयार करण्यात येईल.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp president amit shah master plan for 2019 loksabha election started two day visit to jammu and kashmir
First published on: 29-04-2017 at 11:29 IST