निवडणूक आयोगाचे चौकशीचे आदेश
खाजगी चित्रवाणी वाहिन्यांवरील मालिकांच्या माध्यमातून भाजपचा प्रचार होत असल्याच्या काँग्रेसच्या तक्रारीची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली असून या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.आचारसंहिता भंग व जाणीवपूर्वक प्रेक्षकांचा विश्वासघात करत असल्याप्रकरणी झी टीव्ही, अॅन्ड टीव्ही या वाहिन्यांचे प्रक्षेपण तात्काळ थांबवून ‘भाभीजी घर पर है’, ‘तुझसे है राबता’ या मालिकांच्या निर्माते व कलाकारांसह भारतीय जनता पक्षाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी प्रदेश काँग्रेस सरचिटणीस सचिन सावंत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सोमवारी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली. त्यानंतर आयोगाने चौकशीचे आदेश दिल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.
प्रचारासाठी मालिकांच्या लोकप्रियतेचा उपयोग करून भाजपतर्फे छुप्या मार्गाने सरकारच्या योजनांचा प्रचार केला जात आहे. ही कार्यपद्धती समजून घेण्याकरिता ‘झी टीव्ही’वरील ‘तुझसे है राबता’ व ‘अॅन्ड टीव्ही’वरील ‘भाभीजी घर पर है’ या मालिकांमधील दृश्ये पुरावे म्हणून काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्तांकडे सोपवली आहेत. आयोगानेही चौकशीचे आदेश दिले आहेत. या मालिकांच्या माध्यमातून प्रचार केला जात असेल आणि त्याला पक्षाची मान्यता असेल तर तो खर्च पक्षाच्या खात्यात जमा केला जाईल. मात्र पक्षाच्या मान्यतेशिवाय वाहिन्या किंवा मालिका निर्मात्यांनी परस्पर हा प्रचार केला असेल तर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला जाईल अशी माहिती शिंदे यांनी दिली.