भारतीय हॉकी टीमनं टोक्यो ऑलिम्पिक २०२० मध्ये जर्मनीचा पराभव करून कांस्य पदकाची कमाई केली आहे. या विजयाबद्दल देशभरातून भारतीय हॉकी टीमचं कौतुक केलं जात आहे. सर्वच स्तरातून भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होत असताना भारतीय जनता पक्षानं देखील हॉकी टीमचं कौतुक केलं आहे. भाजपा नेते रवीशंकर प्रसाद यांनी भाजपाच्या मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन भाजपातर्फे हॉकी टीमचं अभिनंदन केलं. यावेळी त्यांनी आजच्याच दिवशी झालेल्या कलम ३७० विषयीच्या निर्णयाचा आणि राम मंदिराच्या भूमिपूजनाचा देखील उल्लेख केला.

५ ऑगस्ट या दिवशीच…

यावेळी बोलताना रवीशंकर प्रसाद यांनी भाजपाकडून टीमचं अभिनंदन केलं. “आम्ही भारतीय हॉकी टीमचं पक्षाकडून अभिनंदन करू इच्छितो. त्यांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे. ४१ वर्षांनंतर त्यांना ऑलिम्पिक मेडल मिळालं आहे. इतर खेळाडूंचं देखील पक्षाकडून अभिनंदन आहे”, असं ते म्हणाले.

 

“आज ५ ऑगस्टचा शुभ दिवस आहे. दोन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी कलम ३७० हटवलं गेलं, गेल्या वर्षी याच दिवशी राम मंदिराचं भूमिपूजन झालं आणि आज पुन्हा एकदा देशात एवढा शुभ दिन आलाय की देशात आनंद आणि उल्हास आहे”, असं रवीशंकर प्रसाद यांनी यावेळी बोलताना नमूद केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारताचा ऐतिहासिक विजय!

भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. भारतीय संघाने जर्मनीचा पराभव करत कांस्यपदक मिळवलं आहे. तब्बल ४१ वर्षांनंतर भारतीय संघाला हॉकीमध्ये पदक मिळालं आहे. अत्यंत चुरशीच्या अशा लढतीत भारतीय संघाने जर्मनीचा ५-४ ने पराभव केला. सुरुवातीला पराभवाच्या छायेत असणाऱ्या भारतीय संघाने जबरदस्त पुनरागमन केलं. भारताचा हा विजय हॉकीच्या इतिहासात सुवर्णअक्षरांनी लिहिला जाईल असाच आहे.