नवी दिल्ली : ‘‘दर निवडणुकीआधी आम आदमी पक्ष (आप) जे नाटक करतो, तेच जुने नाटक सध्या करत आहे. या पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल हे भ्रष्टाचाराचे समर्थन करत आहेत,’’ अशी टीका भाजपने रविवारी केली. गुजरातमध्ये ‘आप’च्या वाढत्या लोकप्रियतेमुळे भाजप विचलित झाला आहे, अशी टीका दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी रविवारी केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपने त्यांच्यावर हे टीकास्त्र सोडले आहे.

आपल्या नेत्यांनी केंद्रीय यंत्रणांच्या अटकेच्या कारवाईसाठी तयार रहावे, असा सल्ला केजरीवाल यांनी दिला आहे. त्याचा संदर्भ देऊन भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केजरीवालांवर भ्रष्टाचाराचे समर्थन करून त्याला प्रतिष्ठा दिल्याचा आरोप केला. पात्रा म्हणाले, की साक्षी-पुराव्यांच्या वाढत्या दबावामुळे केजरीवालांचे भ्रष्टाचाराने ‘कलंकित’ सहकाऱ्यांना राजीनामा द्यावा लागणार आहे. त्याआधी त्यांचा बचाव करण्याची केजरीवाल यांची जुनी सवय असल्याचे पात्रा यांनी सांगितले.

हेही वाचा >>> महाविकास आघाडीने केवळ ‘वसुली सरकार’ म्हणून काम केले ; महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांचा आरोप

पात्रा म्हणाले, की केजरीवाल हे अहंगंडांने पछाडलेले, आत्ममग्न आणि मोठमोठय़ा वल्गना करणारे आहेत. दोन राज्यांमध्ये सत्ता मिळवल्यानंतर ते स्वत:ला देव मानू लागले आहेत. मद्यव्यवसायातून दलाली घेतलेल्या केजरीवाल यांनी स्वत:ची तुलना राक्षसांचे निर्दालन करणाऱ्या ‘कान्हा’सह (भगवान कृष्ण) केली. कोणत्याही राज्याच्या निवडणुकीपूर्वी ‘आप’ जिंकत असल्याचा दावा करून केजरीवाल इतर पक्ष विचलित झाल्याचा आरोप करत असताता. मात्र, हिमाचल प्रदेशमध्ये ‘आप’मध्ये फूट पडली आहे. त्याच्या उत्तराखंड प्रदेशाध्यक्षांनी पक्षत्याग केला आहे. केजरीवाल यांनी या दोन राज्यांत ‘आप’ च्या यशाचे मोठे दावे केले होते.

हेही वाचा >>> मतदारांमध्ये सत्तेची मस्ती उतरवण्याची ताकद – अजित पवार

गुजरातमध्ये ‘आप’च्या प्रभावामुळे भाजप विचलित झाल्याच्या केजरीवाल यांच्या दाव्याचा संदर्भ देत पात्रा म्हणाले, की भाजपच्या सत्ताकाळात भाजप अनेक वर्षांपासून विकासमार्गावर अग्रेसर आहे. भविष्यातही त्याची अशीच वाटचाल असेल.  ‘आप’ सर्वाधिक भ्रष्ट आणि अप्रामाणिक पक्ष आहे. जितेंद्रसिंह तोमर, संदीपकुमार यांचा संदर्भ देत पात्रा म्हणाले, भ्रष्टाचारामुळे ‘आप’च्या जेवढय़ा मंत्र्यांनी राजीनामे दिले, तेवढे  कुठल्याही सरकारच्या मंत्र्यांना द्यावे लागले नाहीत.