भाजपचा फेटा जरा महागडा; सेनेचा तुलनेत स्वस्त

सुहास सरदेशमुख, औरंगाबाद

फेटे नाना प्रकारचे, पण त्याची बांधणी वेगळी. पण भाजपचा फेटा तयार करतानाच वेगळा करावा लागतो. डोक्यावरच्या अख्ख्या भगव्या रंगाच्या फेटय़ात अर्धा हिरवा आणि अर्धा भगवा असा तुरा असतो. त्यामुळे भाजपचा फेटाही तुलनेने महाग आहे. त्यात सत्ता आली आणि दरही काहीसे व्हीआयपी झाले. अडीचशे रुपयांपासून ते चारशे रुपयांपर्यंत भाजपचे फेटे मिळतात. शिवसेनेची बहुतांश मंडळी पूर्णत: भगवा फेटा घालते. त्याची किंमत ४५ ते ७५ रुपयांपर्यंत. त्यातही तुऱ्याचा, गोंडय़ाचा असा फेटा असेल तर किंमत दीडशे-दोनशे रुपयांपर्यंत वाढत जाते. फर्निचरची कलाकुसर सोडून पूर्णवेळ फेटे बनविणे आणि ते डोक्यांना बांधणे असा व्यवसाय करणारे जयसिंह होलिये सांगत होते, ‘गेल्या २५ वर्षांपासून या व्यवसायात आहे. पूर्वी हौस म्हणून फेटे बांधायचो, आता फेटेच विकतो आणि बांधतोही.’

फर्निचरची कलाकुसर करणाऱ्या जयसिंहरावांनी फेटे बांधायला सुरुवात केली ती औरंगाबादमध्ये शिवसेना आली तेव्हा. मिरवणुका, शिवजयंतीमध्ये शंभर ते हजार व्यक्तींपर्यंत फेटे बांधावे लागायचे. फेटा तसा किती जुना हे काही सांगता येत नाही. पण अलीकडच्या काळात टोपी बाजूला झाली आणि फेटय़ाची फॅशन आली. लग्नकार्यात आणि राजकीय कार्यक्रमात फेटे अपरिहार्य झाले. तसे होलिये यांचे काम वाढले. आता त्यांच्या घरातील वडील, आई, मुले, बहिणी सर्वजण फेटे बनविण्याचे काम करतात. सात मीटर, नऊ मीटर, ११ मीटपर्यंत फेटे असतात. पण सर्वसाधारणपणे लग्नांमध्ये आणि राजकीय कार्यक्रमांमध्ये चार मीटरची घडी असणारा फेटा वापरला जातो. फेटय़ाला तुरा नसेल तर त्यातला मिरवण्याचा भाग संपून जातो. इथे होलिये यांचे काम सुरू होते. कपडय़ाच्या वरच्या बाजूला निऱ्या केल्या जातात. त्याला इस्त्री केली जाते आणि निऱ्यांचे वरचे टोक कात्रीने कापले जाते. मग होतो तुरा. फेटा बांधून तुरा वर खोवणे हे खरे कौशल्याचे काम. बहुतेकांना फेटा बांधता येत नाही. मग स्वत: फेटा विकायचा आणि बांधायचाही असा व्यवसाय त्यांनी स्वीकारला. महाराष्ट्रीयन, गुजराती, काठियेवाडी, बंगळुरी, राजस्थानी अशी फेटय़ांची बांधणी त्यांना करता येते. आता त्यांचा धंदा थोडासा तेजीत असणार आहे. युती झाल्याने भाजप आणि सेनेच्या नेत्यांना कधी महागडा तर कधी स्वस्त असा फेटा ते देऊ शकतील. बहुतांश बडय़ा नेत्यांना फेटा बांधण्याचा अनुभव जयसिंह होलिये आणि त्यांचे वडील नारायणसिंह यांनी केले आहे. त्यात अगदी अटलबिहारी वाजपेयी होते आणि लालूप्रसाद यादवसुद्धा.