रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी हे तुरुंगामधून बाहेर आल्यानंतर आपल्याला पूर्णपणे वेगळ्या स्वरुपात दिसतील असा विश्वास भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते असणाऱ्या भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी व्यक्त केला आहे. रिपब्लिक टीव्हीवरील एका चर्चेदरम्यान पात्रा यांनी अर्बण यांची तुलना थेट महात्मा गांधी आणि दक्षिण आफ्रिकेचे माजी दिवंगत नेते नेल्सन मंडेला यांच्याशी केली. अर्णब यांनाही या दोघांप्रमाणे त्रास सहन करावा लागत असून भविष्यात आपल्याला अर्णब अगदी वेगळ्या स्वरुपात दिसतील असं पात्रा यांनी म्हटलं आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अर्णब हे भारतीय प्रसारमाध्यमांचे नेल्सन मंडेला ठरतील आणि ते प्रसारमाध्यमांचे चेहरामोहरा बदलून टाकतील असं मतही पात्रा यांनी व्यक्त केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ती हिंमत कोणीच करु शकत नाही…

अर्णब यांना नक्कीच न्याय मिळेल असा विश्वास पात्रा यांनी व्यक्त केला. “अर्णब यांना न्याय नक्कीच मिळेल. सगळ्याच गोष्टी टीव्हीवर सांगता येत नाहीत. भारतीय संविधानावर विश्वास ठेवा. मी भारतीय जनता पार्टीवर किंवा सरकारवर विश्वास ठेवा असं मी म्हणणार नाही कारण या दोन्ही गोष्टीही संविधानानुसारच काम करतात. पहिली गोष्ट म्हणजे अर्णबला कोणीच काही नुकसान पोहचवण्याची हिंमत करु शकत नाही,” असं पात्रा म्हणाले.

गांधी-मंडेलांशी तुलना

अर्णब यांना सध्या झालेली अटक ही त्यांच्या आयु्ष्याला वेगळी कलाटणी देईल असंही पात्रा म्हणाले. “ही घटना अर्णबच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरेल असा माझा अंदाज आहे. या पुढे मी अर्णबला भारतीय प्रसारमाध्यमांचा नेल्सन मंडेला म्हणेल. तो भारतीय प्रसारमाध्यमांना कायमचा बदलून टाकेल असा मला विश्वास आहे. ब्रिटीशांनी गांधींना चालू ट्रेनमधून बाहेर धक्का दिल्यानंतर ते महत्मा गांधी झाले. त्यामुळेच त्यांनी लढा सुरु केला आणि ते पुढे खूप मोठे नेते झाले. त्यांना जो त्रास व्हायला नको होता तसा त्रास देण्यात आला. तशाच पद्धतीचा त्रास सध्या अर्णबला दिला जात आहे. मला सर्व भारतीयांना सांगायचे आहे की आपल्याला लवकरच पूर्णपणे बदलेला वेगळा अर्णब पहायला मिळेल,” असं पात्रा यांनी यावेळी नमूद केलं.

अर्णब यांचा दोष हाच की…

त्याचप्रमाणे पात्रा यांनी अर्णब यांनी अनेक प्रकरणांबद्दल आवाज उठवल्याने त्यांना त्रास दिला जात असल्याचा दावा केला आहे. “उशीरा दिलेला न्याय हा अन्यायच असतो असं सांगत मी हात जोडून न्यायलयातील मान्यवरांना विनंती करतो की आपण सर्व प्रकारे दोषी ठरलेल्या दहशतवाद्यासाठी रात्री न्यायलयाचे कामकाज केलं आहे. याकुब मेननसारख्या व्यक्तीसाठीही न्यायलये रात्री उघडली. अर्णबचा दोष काय होता तर त्याने पालघरमधील साधुंसाठी न्यायाची मागणी केली, त्याला एका मरण पावलेल्या अभिनेत्याला (सुशात सिंह राजपूतला) न्याय मिळवून द्यायचा होता, त्याला अमलीपदार्थ मुक्त भारत हवा होता. त्याने काही राजकारण्यांची नाव घेतली त्यांच्यावर टीका केली म्हणून त्याला हे सहन करावं लागत आहे याबद्दल खेद आहे. मात्र भारत आता जागृक देश आहे आणि भारत कोणासमोरही झुकणार नाही,” असं मत पात्रांनी व्यक्त केलं.

मला अनेकांचे फोन येतात…

सोमवारी संध्याकाळी रिपब्लिक टीव्हीवरील चर्चा सत्रामध्ये सहभागी झालेल्या पात्रा यांनी अर्णबच्या सुटकेसाठी आपल्याला अनेकांचे फोन येत असल्याची माहिती दिली. “काहीही करा आणि अर्णबला तुरुंगातून बाहेर काढा अशी मागणी करणारे अनेक फोन मला आले. असे फोन करणाऱ्यांची मी हात जोडून माफी मागतो की मला सर्वांचे फोन उचलता आले नाहीत. आम्हाला देशभरातून फोन येत आहेत. अशाप्रकारचा पाठिंबा मी आतापर्यंत कोणत्याच पत्रकारासाठी पाहिलेला नाही,” असंही पात्रा म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp spokesperson sambit patra compares arnab goswami with mahatma gandhi and nelson mandela scsg
First published on: 10-11-2020 at 11:30 IST