काँग्रेस नेते राहुल गांधी पुन्हा एकदा भाजपाच्या निशाण्यावर आहेत. राहुल गांधी यांचा काठमांडू येथील नाईट क्लबमधील व्हिडीओ समोर आल्यानंतर भाजपाने पुन्हा एकदा राहुल गांधींना घेरलं आहे. राहुल गांधींचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भाजपाचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी राहुल गांधी यांचा व्हिडीओ ट्वीट केला असून म्हटलं आहे की, “मुंबईला वेठीस धरलं जात असताना राहुल गांधी नाईट क्लबमध्ये होते. जेव्हा त्यांच्या पक्षात अनेक स्फोट होत आहेत तेव्हा ते नाईट क्लबमध्ये आहेत. ते सुसंगत आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे काँग्रेस पक्षाने बाहेरील व्यक्तीला अध्यक्षपद सोपवण्यास नकार दिला असतानाच त्यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवाराला फटका बसत आहे”.

या व्हिडीओमध्ये राहुल गांधी एका नाईट क्लबमध्ये आपल्या मैत्रिणीसोबत दिसत आहेत. यावेळी तिथे म्युझिक सुरु असून इतर लोक डान्स करताना दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळची राजधानी असणाऱ्या काठमांडूमध्ये हा नाईट क्लब आहे. हा तेथील प्रसिद्ध क्लब आहे. राहुल गांधी आपल्या पत्रकार मैत्रिणीच्या लग्नाला हजेरी लावण्यासाठी सोमवारी नेपाळमध्ये पोहोचले होते.

भाजपा नेत्यांचं म्हणणं आहे की, हा त्यांचा खासगी दौरा आहे याबाबत काही म्हणणं नाही. पण राजस्थानच्या जोधपूरमध्ये हिंसा झालेली असताना, कायदा-सुव्यवस्था बिघडलेली असताना काँग्रेसच्या एका जबाबदार व्यक्तीला पार्टी करणं शोभतं का?

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनीदेखील राहुल गांधींचा व्हिडीओ ट्वीट करत निशाणा साधला आहे. “नियमित पार्ट्या, सुट्ट्या, खासगी विदेश दौरे हे आता देशाला काही नवे नाही. एक नागरिक या नात्याने हा मुद्दा नाही, पण एक खासदार, एका राष्ट्रीय पक्षाचे कायमस्वरुपी मालक जे नेहमी इतरांना उपदेश देत असतात,” असं ते म्हणाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंतप्रधानांच्या विदेश दौऱ्यावरुन निशाणा

विशेष म्हणजे काही तासांपूर्वीच काँग्रेसने विदेश दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. नरेंद्र मोदी जर्मनी, डेन्मार्क आणि फ्रान्सच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. “देशात संकटं असताना साहेबांना विदेश दौरे आवडतात,” अशी टीका काँग्रेसने केली होती.