राहुल गांधी यांची टीका
भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून देशात विरोधी आवाज दाबून टाकले जात आहेत, असा आरोप करीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी संघ परिवारावर टीका केली.
कोल्लम जिल्ह्य़ात सेंट स्टीफन कॉलेज मैदानावर आयोजित सभेत त्यांनी सांगितले की, भारतात देशातील लोकांचे राज्य असायला पाहिजे, कुठल्या विचारसरणीचे किंवा व्यक्तीचे राज्य नको. सध्या देश भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अधिपत्याखाली भरडून निघत आहे. ते इतरांचा आवाज दडपून टाकीत आहेत. एकाच विचारसरणीचे राज्य देशावर असावे असे त्यांना वाटते. आम्हाला मात्र देशात जनतेचे राज्य हवे आहे. देशात एका व्यक्तीचे राज्य आम्हाला मान्य नाही. जर कुणाचा आमच्या विचारसरणीवर विश्वास नसेल तर त्यांना नष्ट करू असे भाजप व संघाचे म्हणणे आहे. पंतप्रधान काँग्रेसमुक्त भारताची स्वप्ने पाहत आहेत. त्यांना देशातील काँग्रेस ही संकल्पनाच खोडून काढायची आहे. पण आम्ही हे चालू देणार नाही. त्यांना चुकीचे ठरवून दाखवू. निवडणुकांत त्यांना हरवू. पण त्यांच्याविरोधात हिंसाचार करणार नाही.
वायनाडमधून निवडणूक लढवण्याबाबत त्यांनी असे सांगितले की, देशातील सर्वच लोकांना त्यांचा आवाज महत्त्वाचा आहे असे वाटले पाहिजे यासाठी वायनाडमधून निवडणूक लढवित आहे. वायनाडला सहिष्णुतेचा इतिहास आहे. तेथे विविध संस्कृतींचे मनोमीलन आहे. तेथील लोक उर्वरित जगाशी खुलेपणाने जोडले गेले आहेत, त्यांच्यात जगाशी नाते सांगताना वेगळा आत्मविश्वास आहे, न्यूनगंड नाही.
मोदींवर त्यांनी सडकून टीका केली, ते म्हणाले की, पाच वर्षांत त्यांनी दोन कोटी रोजगार, लोकांच्या बँक खात्यात १५ लाख जमा करणे, शेतकऱ्यांना हमी भाव अशी अनेक आश्वासने दिली पण त्यातील एकही पूर्ण झाले नाही.
राफेल करारात अनिल अंबानी यांना ३० हजार कोटी मिळाले. ती रक्कम मनरेगाच्या एका वर्षांच्या तरतुदीइतकी आहे. मोदी यांनी देशातील १५ श्रीमंत व्यक्तींना साडेतीन लाख कोटी रुपये दिले आहेत असा आरोप त्यांनी केला.
राहुल गांधी यांनी भाकपप्रणित डाव्या लोकशाही आघाडीवर टीका करण्याचे टाळले, पक्षभेद विसरून सर्वच केरळी लोकांचे आभार मानले.