विशेषत: मुझफ्फरनगरमधील दंगलीच्या पाश्र्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या सुकाणू समितीची बैठक बुधवारी दिल्लीत पार पडली. यात उत्तर प्रदेशचे पक्षाचे प्रभारीही हजर होते. या दंगलीमुळे उत्तर प्रदेशात मतांचे धृवीकरण होणार असून पक्षाला त्याचा नेमका कसा लाभ उठवता येईल, यावर या बैठकीत ऊहापोह झाल्याचे समजते.
उत्तर प्रदेशातील दंगलींमुळे समाजवादी पक्षाला असलेले अल्पसंख्यकांचे पाठबळ मोठय़ा प्रमाणात घटणार आहे. आजवर राष्ट्रीय लोकदलामागे असलेला जाट समाजही संघटितपणे भाजपच्या पाठिशी उभा राहण्याच्या मनस्थितीत आहे. जटाव मते मायावतींमागे आणि यादवांची मते समाजवादी पक्षाकडे राहिली तरी बिगरजटाव दलितांची मते तसेच बिगरयादव अशी अनुसूचित जाती-जमातींची मते मोठय़ा प्रमाणात भाजपकडे वळण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पश्चिम उत्तर प्रदेशासह राज्याच्या अन्य भागांत भाजपला मोठा लोकाश्रय लाभेल, असा निष्कर्ष या बैठकीत निघाल्याचे समजते.
उत्तर प्रदेशचे विभाजन झाले नव्हते तेव्हा १९९८च्या निवडणुकीत पक्षाने ८५ पैकी ५८ जागा जिंकल्या होत्या आणि ३७ टक्के मते मिळवली होती. यावेळी राज्यातील लोकसभेच्या ८० पैकी किमान ३० जागा पक्षाला मिळतील, असे एका नेत्याने सांगितले.
नरेंद्र मोदी हे उत्तर प्रदेशातून उभे राहतील, ही प्रसिद्धी माध्यमांची वावडी आहे, असेही या नेत्याने सांगितले. यंदाच्या निवडणुकीत कल्याण सिंह, उमा भारती, विनय कटियार, मुरली मनोहर जोशी, वरुण गांधी हे उत्तर प्रदेशातून निवडणूक रिंगणात उतरतील, असेही या नेत्याने सांगितले. पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस सरचिटणीस अमित शहा, वरुण गांधी, उपाध्यक्ष मुख्तार अब्बास नक्वी, विनय कटियार, उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत वाजपेयी आणि कल्याण सिंह उपस्थित होते.