पश्चिम बंगालच्या नॉर्थ २४ परगणामधील भाजपा कार्यकर्ते चंदन शॉ यांच्या कुटुंबाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळयाचे निमंत्रण मिळाले आहे. पण त्यांच्या पत्नीने न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी केली आहे. चंदन शॉ यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळी झाडून हत्या केली होती.

चंदन शॉ यांच्या संपूर्ण कुटुंबाला शपथविधी सोहळयाचे निमंत्रण देण्यात आले आहे. मोदींच्या विजयासाठी माझ्या नवऱ्याने आयुष्य दिले. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी चंदन शॉ यांच्या पत्नीने केली आहे. पश्चिम बंगालमध्ये निवडणूक हिंसाचारात मरण पावलेल्या भाजपा कार्यकर्त्यांच्या कुटुंबांना पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळयाचे निमंत्रण दिले आहे. त्यावरुन आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या नरेद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. मंगळवारी रात्री आपण शपथविधीला हजर रहणार असल्याचे ममता यांनी सांगितले होते. अखेरच्या क्षणाला ममता बॅनर्जी यांनी यु टर्न घेतल्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

ममता बॅनर्जी यांनी आपल्या ट्विटरवर एक चिठ्टी पोस्ट केली आहे. त्यामध्ये कार्यक्रमात न येण्याचे कारण सांगितले आहे. भाजपाने या कार्यक्रमाला पश्चिम बंगालमध्ये हत्या झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांना बोलवून ही राजकीय हत्या झाल्याचे भासवले आहे. त्यांच्या हत्या वैयक्तिक कारणामुळे झाल्या आहेत असे ममता बॅनर्जीने म्हटले आहे.