भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्षा खासदार पूनम महाजन यांनी रविवारी रजनीकांत यांची चेन्नईत भेट घेतली. या भेटीवरुन पुन्हा एकदा राजकीय खलबत सुरु झाले आहे. ही भेट राजकीय नसल्याचे सूत्रांचे म्हणणे असले तरी रजनीकांत यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा यानिमित्ताने नव्याने रंगू लागली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजयुमोच्या अध्यक्षा आणि खासदार पूनम महाजन सध्या तामिळनाडूत असून भाजपच्या कार्यकर्त्यांना त्या मार्गदर्शन करणार आहेत. रविवारी चेन्नईत पूनम महाजन यांनी रजनीकांत आणि त्यांची पत्नी लता यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यादरम्यान मुरलीधर राव आणि भाजपचे आणखी एक नेता उपस्थित होता. ही भेट राजकीय नसल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. पूनम महाजन यांनीदेखील ट्विटरवर या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. ‘सर्वात नम्र दाम्पत्याची भेट घेतली’ असे पूनम महाजन यांनी फोटो शेअर करताना म्हटले आहे.

पूनम महाजन आणि रजनीकांत यांच्या भेटीने पुन्हा चर्चा रंगली आहे. रजनीकांत यांनी काही महिन्यांपूर्वी राजकारणात उतरण्याचे संकेत दिले होते. ‘मी (राजकारणात) कधी येईन, कसा येईन हे कोणालाच सांगता येणार नाही. पण गरज निर्माण झाल्यास मी नक्की येईन’ असे रजनीकांत यांनी म्हटले होते. ते भाजपत जाणार असल्याचे वृत्त होते. मात्र कन्नडिगांना तामिळनाडूतील राजकारणात स्थान नाही असे म्हणत तामिळ संघटनांनी रजनीकांत यांच्या राजकीय प्रवेशाला विरोधही दर्शवला होता. तामिळनाडूचे राजकारण द्रमुक आणि अण्णाद्रमुक या दोन पक्षांभोवती फिरत आले आहे. जयललितांच्या निधनानंतर अण्णाद्रमुकमध्ये पडलेली फूट, द्रमुकचे भीष्माचार्य करुणानिधींची सक्रीय राजकारणातून निवृत्ती अशा परिस्थितीमध्ये रजनीकांत यांच्या रुपाने ही पोकळी भरुन काढण्याची भाजपचा प्रयत्न आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp yuva morcha national president mp poonam mahajan meets rajinikanth in chennai not political says sources
First published on: 07-08-2017 at 13:55 IST