सर्वोच्च न्यायालयाने शपथविधी रोखण्यास नकार दिल्यानंतर भाजप नेते येडियुरप्पा यांनी अखेर आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राजभवनात आज सकाळी राज्यपाल वजूभाई वाला यांनी त्यांना मुख्यमंत्रीपदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. विधानसभेत बहुमत सिद्ध झाल्यानंतरच इतर मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे. त्यांना आता येत्या १५ दिवसांत बहुमत सिद्ध करायचे आहे.

सकाळी नऊ वाजता राजभवनाच्या लॉनवरील ग्लास हाऊसमध्ये कडेकोट बंदोबस्तात त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली. या वेळी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, धर्मेंद्र प्रधान, जे.पी. नड्डा आणि भाजपाचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिले नाहीत. दरम्यान, शपथविधीला जाण्यापूर्वी येडियुरप्पा यांनी सकाळी विविध मंदिरांमध्ये जाऊन देव दर्शन घेतले.

 

राजभवनाबाहेर भाजपा कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. येडियुरप्पा यांचे शपथविधीसाठी तेथे आगमन होताच कार्यकर्त्यांनी ‘मोदी-मोदी’ आणि वंदे ‘मातरम’च्या घोषणा देऊ लागले. अनेक कार्यकर्त्यांनी पारंपारिक वेशभूषा केली होती. कार्यक्रमस्थळी ढोल-ताशांचा गजर सुरू होता.