नवी दिल्ली : पुढील सहा महिन्यांमध्ये होणाऱ्या तेलंगण, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या आखणीसाठी भाजपने शुक्रवारी निवडणूक प्रभारी नियुक्त केले. भाजपचे ज्येष्ठ नेते व खासदार प्रकाश जावडेकर यांच्याकडे अत्यंत महत्त्वाच्या तेलंगणाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. केंद्रीय संसदीयमंत्री प्रल्हाद जोशी हे राजस्थानचे निवडणूक प्रभारी असतील. तर, गुजरातचे माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल व हरियाणाचे भाजप नेता कुलदीप विष्णोई हे दोघे सहप्रभारी असतील. राजस्थानातील ६० हून अधिक विधानसभा मतदारसंघांमध्ये विष्णोई समाजाची मते निर्णायक ठरतात.

भाजपचे नेते प्रकाश जावडेकर केरळचे प्रभारी असून आता त्यांच्याकडे तेलंगणाच्या निवडणुकीचीही जबाबदारी देण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे विश्वासू मानले गेलेले राष्ट्रीय महासचिव सुनील बन्सल सहप्रभारी असतील. तेलंगणामध्ये केंद्रीयमंत्री जी. किशन रेड्डी यांची नुकतीच प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (८ जुलै) तेलंगणातील वारंगळमध्ये जाहीरसभा होत आहे. जावडेकर शुक्रवारी तेलंगणाला रवाना झाले असून पहिल्या टप्प्यात दोन दिवस तिथल्या परिस्थितीचा आढावा घेणार असल्याचे जावडेकर यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मध्य प्रदेशमध्ये दोन केंद्रीयमंत्री निवडणूक प्रभारी असतील. केंद्रीयमंत्री भूपेंद्र यादव प्रभारी तर, अश्विनी वैष्णव सहप्रभारी असतील. छत्तीसगडमध्ये मोदींचे विश्वासू ओमप्रकाश माथुर प्रभारी तर केंद्रीयमंत्री मनसुख मंडाविया सहप्रभारी असतील. भाजपने चार केंद्रीय मंत्र्यांकडे निवडणुकीची जबाबदारी दिली आहे. तेलंगणाच्या जनतेने मोठय़ा उमेदीने ‘भारत राष्ट्र समिती’ला निवडून दिले होते पण, पक्षाचे प्रमुख व मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी जनतेचा विश्वासघात केला. आता भाजप तेलंगणा जिंकण्यासाठी लढेल.  -प्रकाश जावडेकर