कृष्णवर्णीय अमेरिकन जॉर्ज फ्लाइड याच्या हत्येप्रकरणी माजी पोलीस अधिकारी डेरेक चाउविन याला कोर्टाने दोषी ठरवलं आहे. या हत्येप्रकरणी कोर्टाने त्याला २२ वर्षे आणि ६ महिन्यांची शिक्षा ठोठावली आहे. अधिकारांचा दुरुपयोग आणि निर्घृणपणे हत्या केल्याने हा निकाल देण्यात आला आहे. २५ मे २०२० मध्ये मिनियापोलीसमध्ये बनावट नोटांप्रकरणी पोलीस कर्मचारी डेरेकने फ्लाइडच्या गळा गुडघ्याने ९ मिनिटं दाबून धरला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर अमेरिकेत कृष्णवर्णीयांवरील अत्याचाराविरोधात ‘ब्लॅक लाइव्हज मॅटर’ ही चळवळ सुरू झाली होती.
खटल्यादरम्यान डेरेकच्या वकिलांनी ही एक चूक असल्याचं सांगितलं होतं. मात्र कोर्टाने ही बाजू फेटाळून लावली. डेरेक शिक्षेस पात्र असल्याचा निर्वाळा कोर्टाने दिला. कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर फ्लाइडच्या कुटुंबियांनी समाधान व्यक्त केलं आहे. मात्र चाउविनला ३० वर्षांची शिक्षा द्यायला हवी होती, असं मतही मांडलं आहे. दुसरीकडे चांगल्या वर्तवणुकीसाठी त्याला १५ वर्षे शिक्षा भोगल्यानंतर पॅरोल देण्याची अनुमतीही देण्यात आली आहे.
मौलवीच्या गुप्तांगावरच पत्नीने केला वार; तिसऱ्या लग्नाच्या तयारीत असल्यामुळे केला हल्ला
जॉर्जच्या हत्येनंतर संपूर्ण जगात याचे पडसाद उमटले होते. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला होता. या व्हिडिओत जॉर्ज श्वास घेण्यास त्रास होत असल्याचं वारंवार सांगत होता. मात्र डेरेकने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्याचा जीव गेला.
सुनावणीवेळी काय झालं?
जॉर्ज फ्लाइड याच्या हत्या प्रकरणातील सुनावणीवेळी त्याचा भाऊ टेरेंस फ्लाइड याने आरोपींना जास्तीत जास्त शिक्षेची मागणी केली होती. ही शिक्षा ४० वर्षांपर्यंत आहे. “तुम्ही काय विचार करत होतात?, त्यावेळी तुमच्या डोक्यात काय सुरु होतं?, जेव्हा माझ्या भावाचा गळा गुडघ्याने दाबला होता?”, टेरेंसने सुनावणी दरम्यान आरोपीला डेरेकला असे प्रश्न विचारले. फ्लाइडची सात वर्षीय मुलगी जियानाही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या खटल्याच्या सुनावणी दरम्यान उपस्थित होती. यावेळी तिने वडिलांची आठवण येत असल्याचे भावुक उद्गार काढले.