ब्लॅकबेरीशिवाय इतर कंपन्यांच्या हॅण्डसेटमध्ये ब्लॅकबेरी मेसेंजर सेवा खुली करण्याला सोमवारी कंपनीने तात्पुरती स्थगिती दिली. तांत्रिक कारणांमुळे ही स्थगिती देण्यात येत असल्याचे ब्लॅकबेरीने म्हटले आहे.
ब्लॅकबेरी मसेंजर सेवा (बीबीएम) अ‍ॅंड्रॉईड आणि आयफोनमध्येही देण्यास दोन दिवसांपूर्वी कंपनीने सुरुवात केली. मात्र, लगेचच तांत्रिक कारणास्तव ही सेवा स्थगित करण्याचा निर्णय ब्लॅकबेरी कंपनीने घेतला. ज्या ग्राहकांनी आपल्या आयफोनमध्ये ब्लॅकबेरी मेसेंजर अ‍ॅप डाऊनलोड केले आहे. ते या सेवेचा वापर सुरू ठेवू शकतात. मात्र, अ‍ॅड्रॉईडवर आधारित हॅण्डसेट असलेले ग्राहक ही सेवा तूर्त वापरू शकणार नाहीत, असे कंपनीने स्पष्ट केले.
ब्लॅकबेरी मेसेंजर अ‍ॅपची तुम्ही वाट पाहताय, हे आम्हाला माहितीये. आम्ही तुम्हाला या अ‍ॅपबद्दलची माहिती शक्य तितक्या लवकर देऊ. आमच्या टीम्स अहोरात्र त्यावर काम करीत आहेत, असे कंपनीने ट्विटरवर म्हटले आहे.