scorecardresearch

अपघातग्रस्त चिनी विमानाचा ‘ब्लॅकबॉक्स’ सापडला

विमान अपघातात सापडलेले १२३ प्रवासी व ९ कर्मचारी यांच्यापैकी कुणीही अद्याप सापडलेले नाही

बीजिंग : सोमवारी कोसळलेल्या चायना ईस्टर्न एअरलाइन्सच्या विमानाचा दोनपैकी एक ब्लॅकबॉक्स सापडला असल्याचे बचावकार्यात गुंतलेल्यांनी बुधवारी सांगितले.

सोमवारी कुनिमगहून निघून गुआंगझोला जात असलेले चायना ईस्टर्न एअरलाइन्सचे बोइंग ७३७ विमान बुझोऊ शहराच्या तेंग्झियान परगण्यातील मोलांग खेडय़ाजवळ एका पर्वतीय भागात कोसळले होते. चीनमध्ये गेल्या सुमारे दशकभरात झालेला हा सर्वात भीषण विमान अपघात आहे.

या विमानाचा एक ब्लॅकबॉक्स सापडला असल्याचे अपघातस्थळावरील बचाव कार्यकर्त्यांनी झिन्हुआ या सरकारी वृत्तसंस्थेला सांगितले. अधिकृत माध्यमांच्या सांगण्यानुसार, विविध माहितीची (डेटा) नोंद करण्यासाठी अपघातग्रस्त विमानाच्या कॉकपिटमध्ये एक आणि शेपटीच्या भागात एक असे दोन ब्लॅकबॉक्स होते. तपास पथकाला आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या कामांपैकी ब्लॅकबॉक्सचा शोध हे एक काम आहे.

दरम्यान, विमान अपघातात सापडलेले १२३ प्रवासी व ९ कर्मचारी यांच्यापैकी कुणीही अद्याप सापडलेले नाही, असे चायना ईस्टर्न एअरलाइन्सच्या युनान शाखेचे अध्यक्ष सन शिियग यांनी मंगळवारी रात्री सांगितले. विमान अपघाताचे कारण तात्काळ सांगितले जाऊ शकत नाही आणि त्याच्या कारणाबाबतचा तपास कठीण आहे, असे चीनच्या नागरी विमान वाहतूक प्रशासनाचा एक अधिकारी म्हणाला. सध्या, तपास पथक प्रक्रियेनुसार संपूर्ण तपास करत आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Blackbox of the crashed chinese plane found zws

ताज्या बातम्या