काळवीट शिकार प्रकरणात बॉलिवूड अभिनेता सलमान खानला पाचवर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावताना न्यायाधीशांनी काही महत्वाच्या मुद्यांकडे लक्ष वेधले आहे. मुख्य महानगर न्यायदंडाधिकारी देव कुमार खत्री यांनी निकाल देताना महत्वाची निरीक्षण नोंदवली आहेत. आरोपी हा लोकप्रिय कलाकार असून लोक त्यांच्या कृतीचे अनुकरण करतात असे खत्री यांनी आपल्या निकालात म्हटले आहे. बचाव पक्षाने सलमानला याआधी कुठल्याही प्रकरणात शिक्षा झालेली नाही. तो नेहमीच दिलेल्या तारखेला उपस्थित राहिला आहे असे न्यायालयाला सांगितले.

सलमान पाच दिवस वनविभागाच्या ताब्यातही होता. त्यामुळे त्याला प्रोबेशन ऑफ ऑफेंडर्स अॅक्टखाली संधी मिळाली पाहिजे असे सलमानच्या वकिलांनी सांगितले. पण न्यायाधीशांनी परिस्थिती आणि गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन सलमानला संधी देण्यास नकार दिला. वन्य प्राण्यांची बेकायद शिकारण करण्याच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे गुन्हयाची गंभीरता लक्षात घेऊन प्रोबेशन ऑफ ऑफेंडर्स अॅक्टचा आरोपीला लाभ देता येणार नाही असे न्यायाधीशांनी स्पष्ट केले.

आरोपी एक अभिनेता असून त्याला शिक्षा झाली तर अनेकांच्या उदरनिर्वाहावर त्याचा परिणाम होईल असेही सलमानच्या वकिलांनी सांगितले. त्यावर सरकारी वकिलांनी तीव्र आक्षेप घेत आरोपीने अत्यंत गंभीर स्वरुपाचा गुन्हा केला असल्याचे सांगितले. हिट अँड रन आणि अन्य खटलेही सलमानवर चालू आहेत. त्याला जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे असे सरकारी वकिलांनी सांगितले. न्यायालयाने सलमानला दोषी ठरवतानाच या प्रकरणात अन्य आरोपींना दोषमुक्त केले आहे. यामुळे सोनाली बेंद्रे, नीलम आणि अभिनेता सैफ अली खान यांना दिलासा मिळाला आहे. काळवीट शिकार प्रकरणात जोधपूरमधील न्यायालयाने गुरुवारी निकाल दिला. न्या. देवकुमार खत्री यांनी या प्रकरणी निकाल दिला. सकाळी सव्वा अकराच्या सुमारास न्या. खत्री न्यायालयात पोहोचले.