ब्लेड रनर अशी ओळख असलेल्या ऑस्कर पिस्टोरियसची ११ वर्षांनी पॅरोलवर सुटका करण्यात आली आहे. ऑस्कर पिस्टोरियसने त्याच्या गर्लफ्रेंडची हत्या केल्याप्रकरणी तुरुंगात धाडण्यात आलं होतं. ११ वर्षांपूर्वी त्याला अटक करुन तुरुंगात पाठवण्यात आलं होतं. आता पॅरोलवर त्याची सुटका करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

२०१२ च्या पॅराऑलिम्पिक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेला सुवर्णपदक जिंकून देणारा ऑस्कर पिस्टोरियस ११ वर्षांनी बाहेर आला आहे. आपल्या राहत्या घरात प्रेयसी रिव्हा स्टीनकॅम्पची त्याने गोळ्या झाडून हत्या केली. आज ११ वर्षांनी तो तुरुंगाबाहेर आला आहे. रॉयटर्सने या विषयीचं वृत्त दिलं आहे.

ऑस्कर पिस्टोरियस ५ जानेवारी रोजी पॅरोलवर तुरुंगाबाहेर येणार आहे हे वृत्त दोन दिवसांपूर्वीच आलं होतं. त्याने त्याची प्रेयसी रिव्हा स्टीनकॅम्पचा २०१३ मध्ये व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी गोळ्या झाडून हत्या केली. ऑस्कर पिस्टोरियस हा कार्बन-फायबरच्या कृत्रीम पायांच्या मदतीने वेगात धावण्याच्या शैलीमुळे त्याला ‘ब्लेड रनर’ म्हणून ओळखला जातो. त्याला या खुनाप्रकरणी १३ वर्षे आणि ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. मार्च २०२३ मध्ये त्याने आपली अर्धी शिक्षा भोगली होती. त्यामुळे पॅरोलवर बाहेर येण्यास तो पात्र ठरला होता. पुढे २४ नोव्हेंबर २०२३ मध्ये त्याच्या पॅरोलचा अर्ज मंजूर करण्यात आला होता. या आदेशानुसार तो आज तुरुंगातून बाहेर आला आहे.

पिस्टोरियपुढे वेगवेगळ्या अटी

तुरुंगातून आल्यानंतर पिस्टोरियसला लैंगिक हिंसाचाराबाबत जनजागृती करणाऱ्या कार्यक्रमांना उपस्थित राहावे लागेल. राग नियंत्रणात राहावा यासाठी त्याला वेगेवगळ्या थेरेपीज सुरू ठेवाव्या लागणार आहेत. पॅरोल मंजूर करतानाच त्याला या अटी घालण्यात आल्या आहेत. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तो प्रिटोरिया येथे राहण्याची शक्यता आहे.