कंटई (पश्चिम बंगाल) : पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यात शुक्रवारी रात्री तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक बॅनर्जी यांच्या सभेच्या ठिकाणापासून जवळच झालेल्या स्फोटात तीन जण ठार, तर अनेक जखमी झाले.कंटई शहरापासून दीड किलोमीटरवर असलेल्या भूपतीनगर भागात तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस बॅनर्जी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. त्याच वेळी सभास्थळाच्या परिसरातील एका घरात हा स्फोट झाल्याचे पोलिसांनी सांगितले. स्फोटात ठार झालेल्या नागरिकांचे मृतदेह शनिवारी ताब्यात घेण्यात आले. मृतांची ओळख पटली असून त्यापैकी एक जण तृणमूल काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याचे सांगण्यात येते.
नेमका कशाचा स्फोट झाला, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.दरम्यान, या स्फोटास तृणमूल काँग्रेसच जबाबदार असल्याचा आरोप भाजपने केला आहे. पश्चिम बंगालमध्ये केवळ बॉम्ब बनवण्याचे कारखानेच उभे राहात आहेत, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोष यांनी केली आहे.