नवी दिल्ली : रक्त पातळ करणाऱ्या औषधांमुळे करोनाग्रस्त रुग्णात मृत्यू व रुग्णालयात दाखल करण्याची शक्यता अनुक्रमे ५० व ४३ टक्के कमी होते,असे लॅन्सेटच्या इक्लिनिकल मेडिसीन जर्नलमधील शोधनिबंधात म्हटले आहे. या संशोधनात ६१९५ रुग्णांचा समावेश करण्यात आला होता, ते १८ वर्षे वयावरील होते. त्यांना ४ मार्च ते २७ ऑगस्ट २०२० या काळात कोविड झाला होता .अमेरिकेतील १२ रुग्णालये व ६० दवाखान्यांमधून त्यांची माहिती घेण्यात आली. अमेरिकेतील मिनेसोटा विद्यापीठ व स्वित्झर्लंडमधील बॅसेल विद्यापीठ यांनी याबाबतचे संशोधन केले असून रक्त पातळ करण्याची औषधे ९० दिवस करोनाग्रस्त रुग्णांना दिल्यास काय परिणाम होतात याचा शोध घेतला आहे. त्यात करोना होण्यापूर्वी व नंतरच्या काळाचा विचार करण्यात आला असून रुग्णालयात दाखल करणे व मृत्यूचे प्रमाण या दोन निकषांवर तपासणी केली आहे. संशोधकांच्या असे लक्षात आले,की रक्ताच्या गुठळ्या टाळणारी औषधे रुग्णांना दिली असता त्यांच्यात रुग्णालयात दाखल करण्याची वेळ कमी येते तसेच मृत्यूचे प्रमाणही कमी होते. अभ्यासात असे दिसून आले की, रक्त पातळ करण्याची औषधे दिल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्याचे प्रमाण ४३ टक्के कमी होते तर मृत्यूची जोखीम ५० टक्के कमी होते. यात वय कितीही असले तरी त्याचा संबंध आलेला नाही. सर्वांना या औषधांचा सारखाच फायदा झाला आहे. रक्त पातळ करणारी औषधे करोना रुग्णांमध्ये जगात अनेक ठिकाणी वापरण्यात आली होती. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण निम्म्याने कमी झाले. औषधाचे प्रमाण किती आहे याचाही त्याच्याशी संबंध नव्हता. किमान पातळीवर ही औषधे दिली तरी त्याचा परिणाम दिसून आला. रक्त पातळ करणारी औषधे फुफ्फुसात किंवा पायात रक्ताच्या गाठी होण्याची शक्यता असल्यास दिली जातात शिवाय मेंदूतही रक्ताची गाठ होण्याचा धोका असतो त्यात त्यांचा वापर  केला जातो. हृदयविकारातही ही औषधे उपयोगी पडतात, असे मिनेसोटा विद्यापीठाचे सहायक प्राध्यापक समेह होझायन यांनी म्हटले आहे. आताच्या काळात करोना रुग्णांना रक्त पातळ करण्याची औषधे देण्यात यावीत असे उपचार नियमावलीतच म्हटले आहे. कारण ही औषधे प्राणरक्षक ठरली आहेत. आता इजिप्त व जगाच्या इतर भागातील व्यक्तींचाही या अनुषंगाने अभ्यास केला जात आहे.