जागतिक मंदीच्या तोंडावर ब्लू स्टारची ३५० कोटींची मोठी गुंतवणूक, सामान्यांना असा होऊ शकतो फायदा | Blue star ac company invest 350 crores in new project at sri city rmm 97 | Loksatta

जागतिक मंदीच्या तोंडावर ब्लू स्टारची ३५० कोटींची मोठी गुंतवणूक, सामान्यांना असा होऊ शकतो फायदा

ब्लू स्टारने श्री सिटी येथील नवीन प्रकल्पात ३५० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

blue star
ब्लू स्टार लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी त्यागराजन

सध्या संपूर्ण जग जागतिक मंदीच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलं आहे. जगभरातील अनेक बड्या कंपन्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करत असताना एअर कंडिशनिंग आणि रेफ्रिजरेशन कंपनी ब्लू स्टार लिमिटेडने आंध्र प्रदेशातील श्री सिटी (Sri City) येथे एक नवीन प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पातून पहिल्या टप्प्यात तीन लाख रुम एसी युनिट्सची निर्मिती केली जाणार आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार वाढण्याची शक्यता आहे. ब्लू स्टारने आर्थिक वर्ष २०२७ पर्यंत हे उत्पादन १२ लाखांपर्यंत वाढवण्याचं लक्ष्य ठेवलं आहे.

“सध्या आम्ही दरमहा २५ हजार एसी युनिट्सची निर्मिती करत आहोत, तिसऱ्या टप्प्यापर्यंत दरमहा सुमारे एक लाख युनिट्सचं उत्पादन करण्याचं आमचं लक्ष्य आहे,” असे ब्लू स्टार लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी त्यागराजन (B Thiagarajan) यांनी सांगितलं आहे.

ब्लू स्टारच्या हिमाचल प्रदेश येथील प्रकल्पाची उत्पादन क्षमता वर्षाला सहा लाख एसी युनिट्स इतकी आहे. आंध्र प्रदेशातील श्री सिटी येथील नवीन प्रकल्पामुळे ब्लू स्टार कंपनीची उत्पादन क्षमता तीन लाख युनिट्सने वाढणार आहे.

ब्लू स्टारने प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात ३५० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. आर्थिक वर्ष २०२७ पर्यंत तिसरा टप्पा सुरू होईल. तोपर्यंत २०० कोटींची अतिरिक्त गुंतवणूक केली जाणार आहे, असंही ब्लू स्टारचे व्यवस्थापकीय संचालक म्हणाले.

“कंपनीने सरकारच्या PLI (प्रोडक्शन-लिंक्ड इन्सेंटिव्ह) योजनेद्वारे प्रकल्पातील यंत्रसामग्रीमध्ये १५६ कोटींची रुपयांची गुंतवणूक केली आहे,” अशी माहिती त्यागराजन यांनी दिली.

चालू आर्थिक वर्षात ब्लू स्टार कंपनी आठ लाख रूम एसी युनिट्सची विक्री करेल, असा अंदाज आहे. आता ही ब्लू स्टारने हा नवीन प्रकल्प सुरू केला आहे. आर्थिक वर्ष-२०२४ मध्ये दहा लाख रुम एसी युनिट्सच्या विक्रीचा अंदाज आहे. याशिवाय कंपनीने श्री सिटी येथील प्रकल्पाजवळ अतिरिक्त ४० एकर जमीन खरेदी केली आहे. या ठिकाणी व्यावसायिक उत्पादने तयार केली जाणार आहेत, असंही त्यागराजन यांनी सांगितलं.

दरम्यान, ब्लू स्टार लिमिटेडने विविध प्रकारची ७५ नवीन मॅाडेल्स लाँच केल्याची घोषणाही अलीकडेच केली. ही उत्पादने प्रत्येक वर्गाला परवडणारी असून संबंधित मॅाडेल्सची किंमत रु. २९,९९० पासून सुरू होते, असा दावा कंपनीने केला.

“आमचं उत्पादन लोकांना परवडलं पाहिजे, यावरच आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत. कारण आम्हाला २०२५ या आर्थिक वर्षापर्यंत रूम एसीच्या बाजारपेठेतील वाटा १५ टक्क्यांपर्यंत वाढवायचा आहे. सध्या आमचा बाजारपेठेतील वाटा १३.५ टक्के इतका आहे,” असंही त्यागराजन यांनी पुढे नमूद केलं.

“भारतीय रूम एसी बाजारपेठ सध्या आठ दशलक्ष युनिट्स इतकी आहे. मात्र, येत्या काही वर्षांत यामध्ये लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील दोन-तीन वर्षात भारतीय रूम एसी बाजारपेठ १० ते २५ दशलक्ष युनिट्सपर्यंत जाईल.कारण येत्या काळात ग्रामीण आणि निम शहरी भागातून उत्पादनाला मोठी मागणी वाढेल. ब्लू स्टारच्या एकूण मागणीत सुमारे ६६ टक्के वाटा ग्रामीण भागातून असेल, अशी अपेक्षा त्यागराजन यांनी व्यक्त केली.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-02-2023 at 11:42 IST
Next Story
“मुस्लीम महिलांना मशिदीत नमाज पठण करण्यास मनाई नाही, पण…”, AIMPLB ची सर्वोच्च न्यायालयात माहिती