ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांच्यावर आज संध्याकाळी वरळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गज कलाकार आणि इतर क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. अनेक दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी आणि चार मुलं असा परिवार आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला विनोद खन्ना यांना गिरगावच्या एचएन रिलायन्स फाउंडेशन अॅण्ड रिसर्च सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी खन्ना यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. काही दिवसांनी त्यांना रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी देण्यात आली होती. पण तरीही प्रकृतीत पूर्णपणे सुधारणा झाली नसल्याने त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते.

‘दयावान’ या सिनेमाने विनोद खन्ना यांना नावलौकीक मिळाले होते. यशाच्या शिखरावर असताना विनोद खन्ना यांनी सिनेसृष्टी सोडण्याचा निर्णय घेतला होता. सिनेसृष्टीला अलविदा करून ते आध्यात्मिक गुरू रजनीश (ओशो) यांच्याकडे निघून गेले होते. त्यांच्या या निर्णयामुळे कौटुंबिक कलहात वाढ होत गेली. यामुळेच गीतांजली यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. विनोद खन्ना यांचा जन्म ६ ऑक्टोबर १९४६ मध्ये पेशावर येथे झाला. भारत पाकिस्तान फाळणीनंतर विनोद खन्ना यांचे कुटुंब मुंबईमध्ये स्थायिक झाले होते. १९६८ मध्ये ‘मन का मीत’ या सिनेमातून विनोद खन्ना यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या सिनेमात त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती. त्यानंतर अनेक सिनेमात सहायक अभिनेता आणि खलनायकाच्या भूमिका साकारून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. १९७१ मध्ये ‘हम तूम और वो’ या सिनेमात त्यांनी पहिल्यांदा मुख्य अभिनेता म्हणून काम केले. विनोद खन्ना यांनी ‘मेरे अपने’, ‘कुर्बानी’, ‘पूरब और पश्चिम’, ‘रेशमा और शेरा’, ‘हाथ की सफाई’, ‘हेरा फेरी’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘अमर, अकबर, अँथनी’ या सिनेमांमधून आपल्यातील अभिनय गुण दाखवून दिले होते. त्यानंतर त्यांचा ‘हिरो’ म्हणून प्रवास सुरुच झाला. २०१५ मधील ‘दिलवाले’ हा त्यांचा अखेरचा सिनेमा ठरला. विनोद खन्ना यांचा आगामी सिनेमा ‘एक थी रानी ऐसी भी’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला होता. या ट्रेलर लॉन्चला खास बिग बींनीही हजेरी लावली होती. पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे विनोद खन्ना हजर राहू शकले नव्हते.