Madhya Pradesh : मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दिल्ली पोलिसांनी बनावट नोटाच्या प्रकरणाचा पर्दाफाश करत एका तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीकडून तब्बल २ लाखांपेक्षा जास्त रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. या घटनेमुळे भोपाळमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

अतिरिक्त डीसीपी गौतम सोलंकी यांनी या घटनेची माहिती देताना सांगितलं की, शुक्रवारी संध्याकाळी ४ वाजता त्यांना एक व्यक्ती बनावट नोटा पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत तात्काळ आरोपीला अटक केली. त्यानंतर त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे काही ५०० रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या. आरोपीचं नाव विवेक असं असून प्रिंटर आणि इतर उपकरणांचा वापर करून तो घरी बनावट नोटा छापत होता. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

पोलिसांनी आरोपीकडून २ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या बनावट नोटा, पैसे छपाईचं साहित्य, प्रिंटर जप्त केलं आहे. आता या आरोपीची चौकशी सुरू असून तो आधी एका छापखान्यात काम करत होता अशी माहिती प्राथमिक चौकशीत समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीचा मोबाईल फोन तपासला असता बनावट नोटा कशा बनवायच्या? या संदर्भातील व्हिडीओ त्याच्या मोबाईलमध्ये आढळून आले आहेत.

आरोपीला छापखान्यात काम करण्याचा अनुभव असल्यामुळे त्याला बनावट नोटा छापण्यासाठी अनुभवाची मोठी मदत झाली. त्याने यासाठी ऑनलाइन विशेष कागद देखील मागवला होता. तसेच त्याने नोटांवर आरबीआयची बनावट पट्टी देखील चिकटवली होती. पोलिसांच्या म्हणण्यांनुसार आरोपीने लाखोंच्या बनावट नोटा चलनात वापरल्या आहेत. एवढंच नाही तर ५०० रुपयांच्या बनावट नोटांनी अनेक वस्तू देखील खरेदी केले आहेत. तसेच चौकशी दरम्यान आरोपीने बाजारात ५ ते ६ लाख रुपयांच्या बनावट नोटा चलनात वारल्याची कबुली दिल्याचं वृत्तात म्हटलं आहे.