*  ब्रिक्स परिषदेत भारत-चीन चर्चा
*  द्विपक्षीय संबंध सुधारण्याची परस्परांना ग्वाही
ब्रह्मपुत्रा नदीवर चीन बांधत असलेले धरण आणि त्यामुळे भारताला वाटणारी चिंता हाच विषय केंद्रस्थानी ठेवून पंतप्रधान मनमोहन सिंग आणि चीनचे नवनिर्वाचित अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी बुधवारी रात्री द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली.
ब्रिक्स देशांच्या शिखर परिषदेला येथे सुरुवात झाल्यानंतर प्रथमच उभय नेते आमनेसामने आले. चीनच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर जिनपिंग यांनी अलीकडेच भारताचे गोडवे गायले होते. तसेच ब्रिक्स शिखर परिषदेला रवाना होण्यापूर्वी त्यांनी भारताशी द्विपक्षीय संबंध सुधारण्याबरोबरच सीमातंटाही सोडवण्याची इच्छा प्रदर्शित केली होती.
या पाश्र्वभूमीवर उभय नेत्यांनी ब्रिक्स परिषदेदरम्यान बुधवारी रात्री वेळ काढून चर्चा केली आणि दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यासाठी अधिक प्रयत्न करणार असल्याची ग्वाही एकमेकांना दिली. चीनसोबतचे द्विपक्षीय संबंध अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. पंतप्रधान म्हणून गेले दशकभर चिनी नेत्यांबरोबर सातत्याने संवाद साधण्याची संधी मिळाली, हा माझा सन्मान असल्याचे पंतप्रधान मनमोहन सिंग म्हणाले. तसेच चीनच्या नवीन नेतृत्वाबरोबर अशा प्रकारची चर्चा आणि सुसंवाद साधत दोन्ही देशांमधील संबंध अधिकाधिक दृढ करण्यास आपण उत्सुक असल्याचेही ते म्हणाले.
चीनचे माजी अध्यक्ष हू जिंताओ आणि माजी पंतप्रधान वेन जिआबो यांच्याशी गेल्या काही वर्षांत ब्रिक्स आणि इतर आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये १४ पेक्षा अधिक वेळा पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी चर्चा केली.
दरम्यान, चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाचे कौतुक करून दोन्ही देशांमधील संबंध अधिकाधिक बळकट करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल आनंद व्यक्त केला. भारताबरोबरचे संबंध अधिकाधिक दृढ करण्यावर आपण भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. सुमारे २५ मिनिटे चाललेल्या दोन्ही वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत पाणी प्रश्नावर चर्चा झाली. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी ब्रह्मपुत्रा नदीवर चीन बांधत असलेल्या तीन धरणांमुळे भारताची चिंता वाढल्याचे चीनच्या अध्यक्षांना सांगितल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली. चीन सध्या ब्रह्मपुत्रा नदीवर आपल्या भागात दागू, चियाचा आणि जिएक्सू आदी ठिकाणी धरण बांधत आहे. भारताने चीनच्या या धरणांबद्दल आक्षेप घेतला आहे.