दिल्लीती सामूहिक बलात्कारातील त्या तरुणीच्या मेंदूला दुखापत झाली असून तिच्या फुप्फुस आणि पोटात विषाणूसंसर्ग झाला आहे. या सर्व व्याधींशी ती झुंजत असून तिची प्रकृती चिंताजनकच आहे, असे माऊंट एलिझाबेथ रुग्णालयाने शुक्रवारी जाहीर केले.
रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. केविन लो यांनी सांगितले की, दाखल होण्याआधीच त्या मुलीला हृदयविकाराचा झटका आला होता आणि इथे आल्यानंतरच्या तपासणीत वरील व्याधी जडल्याचेही आढळले.
दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात तिच्यावर तीन शस्त्रक्रिया झाल्या आहेत. त्या शस्त्रक्रियांच्यावेळी ती कृत्रिम श्वसनयंत्रणेवरच होती. तिच्या आतडय़ाचा बराचसा भाग सडल्याने विष पसरू नये यासाठी काढला गेला आहे. ती आल्यापासून विविध तज्ज्ञ तिची प्रकृती सुधारावी यासाठी अथक प्रयत्न करीत आहेत, असे लो म्हणाले.
या मुलीबरोबर तिचे वडीलही सिंगापूरला गेले आहेत. तिच्या कुटुंबियांना इंग्रजी बोलता येत नसल्याने भारतीय दूतावासाने एक दुभाष्या त्यांना दिला आहे. तसेच दूतावासाचा एक अधिकारीही त्यांच्या मदतीला तैनात आहे. रुग्णालयाभोवती बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.